Wednesday, 11 January 2017

अष्टम भावातून आर्थिक नुकसान


नमस्कार मित्रहो

आयुष्यात ऐन तारुण्यात संघर्षाचा कालावधी असेल व तो काही वर्षाकरिता असेल तर हरकत नाही. परंतु तो कालावधी निवृत्तीच्या वयापर्यंत असेल तर...

खालील कुंडली टिचकी मारून बघा. कुंडलीतील जातकाचे नाव गुप्ततेसाठी काढून टाकले आहे.
या कुंडलीला सध्या बुधाची दशा सुरु आहे ती 2022 पर्यंत असेल.


दशास्वामी बुध शनीच्या उ.भाद्रपदा नक्षत्रात. शनी अष्टमात, अष्टमेश व नवमेश आहे. दशा स्वामी अष्टम भावाचा व नवम भावाचा बलवान कार्येश झाल्यामुळे या कालावधीत शिक्षणात अडचणी येतील, हा जातक इंजिनियरिंग मधील शाखेत शिक्षण घेईल. परंतु शिक्षण पूर्ण करताना एक ते दोन वर्षे जास्त लागतील.

अर्थात या कुंडलीचा फार खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरजच नव्हती. जातकाने मला व्यवसायबद्दल प्रश्न विचारला होता पण कुंडलीचे निरीक्षण करताना जातकाच्या शिक्षणाची स्थिती कसे असेल याची कल्पना आली. तस मी त्याला विचारताच त्यांन विषय राहिल्याच सांगितलं.

दशास्वामी बुध अष्टम कार्येश असल्यामुळे व्यवसायात आर्थिक नुकसान होणार हे नक्की परंतु नवमाचा कार्येश असल्यामुळे व्यवसायात बदल सुद्धा होतील. स्थिरत्व येणार नाही.

मी त्याला नुकसानी बद्दल विचारताच त्यानं सांगितलं की त्याचे आतापर्यत 20 ते 25 लाख रुपयांचा व्यवसायात घाटा झाला. नवीन कर्ज काढून व्यवसाय पुढे चालू ठेवू कि बंद करू असा त्याचा प्रश्न होता.

मी त्याच्या पुढील येणाऱ्या महादशा बघितल्या. त्या दशा बघितल्यावर काय बोलावे कळेना. पुढील सर्व दशा म्हणजे केतू , शुक्र , रवी शनीच्याच नक्षत्रात. म्हणजे अष्टम व नवम भाव निवृत्त होई पर्यंत बलवानच राहतील. म्हणजेच स्वतंत्र व्यवसाय करून फायदा होणार नाही. पण पुढे आयुष्य कस चालायचं. 

मी त्याला व्यवसाय न करण्याचं सांगितलं. परिस्थिती समजून सांगितली. तो सुन्नच झाला, म्हंटला यावर काही उपाय नाही का ?

मी त्याला उपाय सांगितला व भागीदारीत 20 ते 30 टक्यांनी व्यवसाय करायला सांगितला. यानंतर जवळ जवळ एक वर्षांनी तो आला होता. त्याच्या भागीदाराला घेऊन. आता त्याच बर चाललंय म्हणाला.

शनी अष्टम भावाचा जर मजबूत कार्येश होत असेल तर तो कर्जबाजारी करून स्थावर जंगम मालमत्ता विकायला भागच पाडतो.  हा अनुभव अनेक जातकांच्या बाबतीत खरा झालाय.

शुभं भवतू ।


आपला 
नानासाहेब 

Wednesday, 13 January 2016

नॉट फिलिंग वेल - गोचर भ्रमण

नमस्कार मित्रांनो


सकाळी उठलो तर अंगात कणकण जाणवत होती. डोक जड़ वाटत होत. तसच आवरायला घेतल. आंघोळ करून बाथरूमच्या बाहेरच आलो तर एका मागे एक सटासट दोन शिंका आल्या. नाश्ता करून कपडे घाले पर्यन्त शिंका येण्याच प्रमाण वाढल. मग मात्र ऑफिसला जाण्याचा विचार सोडून दिला. आणखी त्रास करुन घेण्यापेक्षा आज सुट्टी घेऊ म्हणजे निदान उद्या तरी बर वाटेल हा हेतू.

सर्दिच्या गोळया घेतल्या व आराम करत कै. अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी वाचायाला घेतली. रात्रि पुन्हा गोळयांचा डोस घेतला कारण रात्रि चांगलाच ताप अंगात भरला होता. म्हंटल सर्दी झालीय ताप येणारच.

दुस-या दिवशी सकाळी उठण्याची इच्छाच होईना. अंगात कणकण होतीच. वाटल आंघोळ करून फ्रेश वाटेल. पण कसल काय, डोळे टोपसले होते. निर्णय घेतला आजही आरामच करू. दुपार नंतर घरचे मागे लागले दवाखान्यात जा म्हणून. मी म्हंटल सर्दिचा ताप आहे काय दवाखान्यात जायच. अस म्हणून मी ते टाळल.

रात्रि नऊ साडे नऊ झाले असतील. घरच्यांच चालूच, दवाखान्यात जाऊन ये. आमच ऐकल असत तर कालच बर वाटल असत वगैरे. मग मात्र मी लगेचच दवाखान्यात जायच ठरवल. डॉक्टराना फोन केला तर डॉक्टर साहेब गेस्ट आलेत म्हणून क्लिनिक बंद करून घरी निघून गेले होते. उद्या सकाळी बघू म्हणून पुन्हा एकदा गोळयांचा डोस घेऊन गुड नाईट म्हंटल.

अखेर तिस-या दिवशी क्लिनिक, डॉक्टर, इंजेक्शन, प्रिस्क्रिप्शन, पुन्हा गोळयांचा डोस वगैरे गोष्टी झाल्या. दुपारनंतर मात्र सर्दी जुकाम कणकण गायब. बर वाटायला लागल. दुपारच जेवण झाल्यावर जरा आराम करावा म्हणून पडलो, डोळा लागत असतानाच विचार आला की आपल्या कुंडलित ग्रहांच गोचर भ्रमण काय म्हणतय. आजारी पडण्याच कारण तरी शोधुया म्हणून पंचांग उघडल.

मी आजारी पडलो त्या दिवशी तारीख होती 7 जानेवारी 2016.  पंचांग बघा त्या दिवशी चन्द्र वृश्चिक राशीत व  अनुराधा नक्षत्रात होता. मंगळ तूळेत, शुक्र, शनि वृश्चिक राशीत , रवि धनु राशीत.

माझी मेष लग्नाची कुंडली आहे. मेष लग्नाला वृश्चिक रास अष्टमात येते. अष्टम स्थान हे त्रिक स्थानापैकी एक आहे. मेष लग्न हे चर लग्न असल्याने बाधकेश शनि येतो तसेच परम मारकेश होतो शुक्र.

याचाच अर्थ हा की परम मारकेश शुक्र अष्टमात, बाधकेश शनि अष्टमात, लग्नेश मंगळ तुळेत मारक स्थानात अशी मजबूत कुस्थिति. आता  घटना घडून येण्यासाठी फ़क्त गोचरिने चंद्राच अष्टमातून भ्रमण हेच काय ते बाकी होत.

आणि हे भ्रमण सुरु झाल ६ जानेवारीला. या दिवशी चन्द्र वृश्चिक राशीत आला. पण ७ जानेवारीला अनुराधा नक्षत्रातून त्याच  भ्रमण सुरु झाल आणी त्यादिवशी मी आजारी पडलो. नाकातून पाणी वाहतंय , डोळ्यातून पाणी वाहतंय , डोक भनभन करतंय, अंगात सडकून  ताप भरलेला.  म्हणजे अगदी बेड रेस्ट.  

हिवताप किंवा कुठलाही किरकोळ तात्पुरत्या स्वरूपाचा आजार चंद्राच गोचर भ्रमण ठरवत. त्याकरिता महादशा बगण्याची आवश्यकता नाही.पण अंतर्दशा किंवा विदशा त्रिक स्थानाची कार्येश असायला हवी

ग्रह गोचरीचा असा विस्मय कारक अनुभव अभ्यासकांनी स्वताच्या बाबतीत कधीतरी निश्चित घ्यायला हवा.

शुभं भवतु ।

आपला
नानासाहेब

Thursday, 22 October 2015

विजयादशमी

नमस्कार मित्रहो 

आपणा सर्वांस 
विजयादशमीच्या 
हार्दिक शुभेच्छा

आपला
नानासाहेब

Monday, 27 July 2015

शेअर बाजार - दारुण अपयश

नमस्कार मित्रहो


बऱ्याचदा विचारणा केली जाते की शेअर्स मधे गुंतवणुक केली तर चालेल का ? शेअर्स मार्केट मधे ट्रेडिंग करू   का ? शेअर बाजारा मधे ट्रेडिंग, लॉटरी, सट्टा, जुगार इत्यादिचे आकर्षण पंचम भावामुळे निर्माण होते. पंचम भाव लाभात असेल तर चांगभल नाहीतर आयुष्याच वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वी लॉटरी, सट्टा, जुगारात बरबाद झालेत. आता शेअर्स मधे होत आहेत. असो.

ही अशाच एका जातकाची कुंडली आहे. जातकाचे नाव नेहमी प्रमाणे गुप्त ठेवन्यासाठी कुंडलीतुन त्याच नाव तसेच जन्मा संबंधिचा तपशील काढून टाकला आहे. तपशील न दयायला आणखी एक कारण आहे. बऱ्याच ज्योतिष विषयक हिंदी, इंग्रजी मासिकांमधे ब्लॉग वरचे लेख कॉपी करून वापरले जातात. या लेखांचा उपयोग ज्योतिष विषयक नियतकालीकांमधे करायला हरकत नाही परंतु परवानगी तर घेत जा.

प्रश्न होता मी शेअर्स मधे ट्रेडिंग करू का ? मला त्यात यश मिळेल का ?

कुंडलीला 2008 पासून राहुची दशा सुरु आहे. ही दशा 2026 पर्यंत आहे.

महादशा स्वामी राहु पंचमात असून तो चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात आहे. चन्द्र नवमात व अष्टमेश. अष्टमात एकही ग्रह नाही.

दशास्वामी राहु पंचमात असल्यामुळे शेअर्स मार्केटच आकर्षण निर्माण झाल. इथ पर्यंत ठीक आहे. परंतू दशा स्वामी राहु नवमातील व अष्टमेष चंद्राच्या नक्षत्रात असल्यामुळे अष्टम भावाचा बलवान कार्येश झाला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होणारच.

या जातकाच्या बाबतीतही तेच घडल. लाखो रूपयाचे नुकसान झाल्यावर जाग आली.

प्रश्न मोठ्या आशेने विचारला होता. पण दशास्वामी कुठल्याही प्रतिने यशाचा कार्येश होत नाही त्यामुळे मी त्याला स्पष्टच सांगीतल "अजुन काही दिवस जर या शेअर्स ट्रेडिंग मधे घलाविले तर घर दार विकून देशोधडीला लागाव लागेल."

उत्तर एकून तो नाराज झाला असता पण तो म्हंटला "हे आधीच विचारल असत तर बर झाल असत. माझ एव्हढ नुकसान झाल नसत."

"देशोधडीला लागण्यापेक्षा झाल ते गंगेला मिळाल अस समजा. अन पुन्हा या गोष्टींच्या नादी लागू नका." अस म्हणून मी त्यांना निरोप दिला.शुभं भवतु ।

आपला
नानासाहेब


Sunday, 2 November 2014

व्यवसाय भविष्यात कसा राहील ?नमस्कार मित्रानो

ब-याच कालावधीनंतर लिहिण्यासाठी वेळ मिळाला. म्हणून लिहितोय. अर्थात सध्या कुंडली मध्ये काही विशेषता: जाणवली कि मगच मला लिहायला बर वाटत. असो.

मागे एकदा असाच एका परीचीताचा फोन आला. मला म्हणाले माझे एक स्नेही जरा अडचणीत आहेत त्यांना वेळ द्या. मीही त्यांच्या सोबत येतोय.

सायंकाळी ठरल्या वेळेवर ते आले. मी त्यांची कुंडली मांडली जरा निरीक्षणं केल्यावर त्यांना विचारल तुम्ही जमिनी संबंधी काही व्यवसाय करता का, म्हणजे बांधकाम, जमीन खरेदी विक्री वगैरे  ?

ते म्हंटले हो... पण तुम्ही कस ओळखल ?

मी म्हंटल हे काही विशेष नाही. आमच्या शास्त्राचे कोणीही अगदी सुरुवातीचे अभ्यासक सुद्धा अशा गोष्टी सांगू शकतात. तुम्ही तुमचे प्रश्न काय आहेत ते विचारा?”.

त्यांनी त्यांचे प्रश्न विचारले. त्यावर आमची चर्चा झाली. त्याबद्द्ल मी इथे काही सांगत नाही. त्यांच्या एका प्रश्नावर वर आपण फोकस करू. त्यांनी त्यांचा व्यवसाय भविष्यात कसा राहील 
याबाबत विचारणा केली.

ती कुंडली बाजूला देत आहे. त्या कुंडलीवर टिचकी मारून मोठी करून पाहता येईल. अर्थातच मी जातकाचे नाव गुप्त ठेवण्यासाठी कुंडलीतून काढून टाकले आहे.


वर सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे ते बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय ते करतात.  हाच व्यवसाय ते का करतात बघू या.....

दशमाचा उपनक्षत्र स्वामी राहू असून तो नवमात आहे. राहू रवीच्या दृष्टीत, रवी तृतीयात, लग्नेश व द्वीतीयेश, रवी चित्रा नक्षत्रात, मंगळ पंचमात व चतुर्थेश, राहू मेषेत.  

दशमाचा उप नक्षत्र स्वामी मंगळाचा व चतुर्थ भावाचा कार्येश झाला आहे.

दशास्वामी शनी २००८ ते २०२९ पर्यंत कार्येश आहे. म्हणजेच शनीची महादशा आहे.
दशास्वामी शनी ८, ६, ७  दशास्वामी शनी स्वनक्षत्रात असल्यामुळे नियमाप्रमाणे त्याचा उप नक्षत्र कार्येश होईल. दशास्वामी शनी , ,     उप नक्षत्रस्वामी राहू ९ दृष्टी रवी ३ १ नक्षत्रस्वामी मंगळ ५, , दृष्टी बुध ३, ३, ११, बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु १,५,९.  राहू केतूच्या नक्षत्रात. केतू ३ , युती रवी ३ १ नक्षत्रस्वामी मंगळ ५, ४, राशी स्वामी शुक्र १, १०, नक्षत्रस्वामी गुरु १,५,९

वरील प्रमाणे दशा स्वामी शनीचे कार्यश्वत्व बघता असा लक्षात येईल कि शनीच्या नक्षत्रात एकही ग्रह नसल्यामुळे व शनी ज्या भावांच प्रतिनिधित्व करतोय त्या भावात एकही ग्रह नाही त्यामुळे शनी ८, ६, ७  या भावांचा बलवान कार्यश झाला व राहूच्या माध्यमातून २,४,६,७,८,१०,११ या भावांचाही मजबूत कार्येश झालाय.  

वरील विश्लेषणाचा अभ्यास झाल्यानंतर मी त्यांना म्हंटल कि आणखी पुढील १३ वर्ष तुम्ही करोडो रुपये  कमावणार. एकाच वेळी २, ६, १०, ११ कार्येश झाल्यानंतर काय होणार हे अभ्यासकांना सांगायला नको. नाही का ?

आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीय का ? दशास्वामी शनी अष्टमात असून जलतत्वाच्या राशीत आहे. आहे कि नाही चमत्कार ?

मी त्या जातकाला विचारल तुम्ही जमिनीखालील बांधकाम करता का ? जसे भूमिगत गटारी वगैरे?तर त्याने काय उत्तर दिल असेल ?

हो मी जमिनी खाली बांधकामही करतो. खर म्हणजे माझ्या व्यवसायातील एक प्रमुख घटक तोच आहे. परंतु सध्या तरी गटारी वगैरे नाही तर पेट्रोल पंपाचे बांधकाम, दुरुस्तीचे काम करतो.

आता कळलं का ? मी चमत्कार का म्हंटल ते ? अहो शनी तेलाचा कारक नाही का ?  अर्थात नसेल लक्षात आल तरी हरकत नाही. पेट्रोल पंपाच मलाही क्लिक झाल नव्हत. असो.

एकूण काय तर हि व्यक्ती याच व्यवसायात चिकार पैसा कमावणार आहे.

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब

Sunday, 2 March 2014

वैवाहिक सौख्य कसे राहील ?

नमस्कार मित्रानो !

परवा एक जातक विवाह विषयी प्रश्न  विचारण्यासाठी आला.  त्याने सोबत एक कुंडली सुद्धा आणली होती.  मी  त्याच्या कडची पारंपारिक कुंडली पाहून त्याला म्हंटले कि या कुंडली वरून विवाह योग सांगता येणार नाही.  मला कृष्णमुर्ती पद्धतीची कुंडली  लागते.  तुमच्याकडे नसेल  तर राहू द्या मी माझ्या संघनकावर तयार करून घेतो. जरा वेळ लागेल तो पर्यंत बसा.

ही कुंडली मी बाजूला देत आहे. टिचकी मारून ती मोठी करून बगता येईल. जातकाची इतर माहिती गोपनीयतेमुळे काढून टाकली आहे. 

मी कुंडली तयार करून त्यातील वैवाहिक सौख्य कसे असेल विवाह योग कधी आहे वगैरे गोष्टीं अभ्यासायला सुरवात केली अन  बसलेल्या जातकाला   काय सांगावे हा प्रश्न पडला.  बहुतेक मला पडलेला पेच त्याला कळला असावा. तो म्हंटला "तुम्ही अगदी बिनधास्त सांगा जे काही असेल ते. तुम्ही शुगर कोटेड काही सांगत नाही म्हणूनच तुमच्याकडे आलो"

"शुगर कोटेड वगैरे मला सांगता येत नाही. जे आहे तेच सांगायला लागत. " अस म्हणून मी त्याला कुंडली समजावून सांगायला सुरुवात केली तर तो मध्येच मला थांबवत म्हंटला "मला कुंडलीतल काही कळत नाही त्यामुळे मला त्यातल्या तांत्रिक बाबी नाही सांगितल्या तरी चालतील, मला फक्त एव्हढंच सांगाल  लग्न होणार आहे का ?, आज माझं वय ३५ आहे. आणखी किती वर्ष प्रयत्न करू ?, गेल्या सहा  सात वर्षापासून लग्न योग आहे म्हणतात पण लग्न जमत नाही " त्याच्या या बोलण्यातून प्रचंड निराशा जाणवत होती. 

"तुम्ही लग्न करू नका " मी एका वाक्यात त्याला कुंडली सांगितली. 

"काय ?"  त्याला विस्मय वाटला असावा बहुतेक 

" तुमच्या कुंडलीत विवाहाचे योग नाहीत. आणि समजा अपवादात्मक परिस्थितीत लग्न झालंच तरी वैवाहिक सुख अत्यल्प असल्यामुळे दोन तीन  महिन्याच्या वरती हे लग्न टिकणार नाही" 

"अहो अस कस ?, मला सरकारी नोकरी आहे , स्व:ताच घर दार आहे तरी लग्न होणार नाही ?" त्याला नाही म्हंटल तरी प्रचंड  धक्काच बसला. 

"रतन टाटांकडेहि घर दार , गाडी वगैरे सगळं आहे,    तरी लग्न मात्रं झालं नाही, अगदी भिक-यांचेही लग्न होतात पण नवकोट नारायणाच राहून जातं .  " मी त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी बोललो. 

सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी बुध पंचमात व पंचमेश, शनीच्या नक्षत्रात, शनि षष्ठात, लग्नेश व व्ययेश आहे बुध कुठल्याच प्रतीने विवाहाचा कार्येश होत नाही .

शुक्र दशा २०१२ ते २०३२ पर्यंत.  दशास्वामी शुक्र  षष्ठात, अष्टमेश व तृतीयेश, शुक्र केतूच्या नक्षत्रात, केतू व्ययात, केतू शनीच्या राशीत, शनि षष्ठात, व्ययेश व लग्नेश, शनि शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र वरील प्रमाणे कार्येश. या कुंडलीतील शुक्र, शनि , रवि, चंद्र, राहू, केतू , बुध हे सर्व ग्रह षष्ठ व व्यय या वैवाहिक सौख्य  बिघडवना-या भावांचेच बलवान कार्येश आहेत.त्यामुळे दशां स्वामी शुक्र त्याच्या संपूर्ण दशा कालात वैवाहिक सौख्य मिळू देणार नाही. त्यामुळे लग्न करून दुस-या व्यक्तीच्या आयुष्याची वाट लावण्यात काय अर्थ आहे. 

"मग इतर लोक मला दरवर्षी विवाह योग आहे अस खोट का सांगतात?" त्याने त्याचा मनातला सल सांगितला 

अभ्यासकांनी लग्न कुंडली नीट बघावी. लग्न कुंडलीत  शुक्र, रवि शनि व राहू हे चार ग्रह सप्तमात आहेत, सप्तमेश सप्तमात आहे त्यामुळेच लग्न योग दिसतो. परंतु भावचलित बघितल्यावर मात्र हा गैरसमज दूर होईल व कृष्णमुर्ती पद्धतीत भावचलित कुंडलीला महत्व का देतात ते कळेल.   

तो निराशेनेच उठला. मला त्याच्याकडे बघून वाईट वाटत होतं पण….  नाईलाज को क्या इलाज ? … 

"समजा चुकून लग्न झालच तर ?" जाता जाता त्यानं विचारल . 

"जेव्हढ सुख मिळेल तेव्हढ आनंदाने उपभोगा, बाकी जे होईल ते होईल  … लढते रहो  " अस म्हणून मी त्याला निरोप दिला

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब

Wednesday, 25 September 2013

ओपन हार्ट सर्जरी यशस्वी होईल का ?

नमस्कार मित्रानो !

जून महिन्यात एक इ - पत्र आल.  त्या पत्रात एका जाताकासंबंधी काही प्रश्न विचारले होते.  त्यातला एक अत्यंत महत्वाचा प्रश्नच मी इथे घेत आहे. प्रश्न होता "ओपन हार्ट सर्जरी यशस्वी होईल का ?". या जातकाला लहानपणा पासून हृदयाचा त्रास होता.  बाजूलाच ती कुंडली दिलेली आहे. कुंडलीवर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 


हा जातक गुजरातमधील आहे.हि एका तरुण स्रि जातकाची कुंडली आहे. 

लग्नाचा उपनक्षत्र स्वामी बुध सहा , आठ , बाराचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे जाताकास आरोग्याची साथ मिळणार नाही हे दिसून येते. षष्ठाचा उप नक्षत्र स्वामी शनि मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ सिंह राशीत आहे त्यामुळे हार्टशी संबंधी विकार झाला.  

सध्या कुंडलीला शनीची महादशा सुरु आहे. शनि पंचमात, दशमेश  व लाभेश आहे. शनि मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ पंचमात व सप्तमेश आहे. दशास्वामी पाच, अकराचा कार्येश आहे त्यामुळे या दशेत ऑपरेशन केल्यास जातक आजारातून  पूर्ण बरा होईल हे नक्की. 

जून महिन्यात कुंडलीस शुक्र अंतर्दशा सुरु होति. शुक्र अष्टमात व लग्नेश, शुक्र बुधाच्या उपनक्षत्रात, बुध षष्ठात, द्वितीयेश व तृतीयेश लागला त्यामुळे  ही अंतर्दशा सोडावी लागली. ही ऑगस्ट पर्यंत होती. 

पुढील अंतर्दशा रवीची होती. आता ती सुरु आहे. रवि सप्तमात व पंचमेश, रवि शनीच्या नक्षत्रात, शनि पंचमात, दशमेश व लाभेश. अंतर्दशा स्वामी रवि पाच, अकरा चा बलवान कार्येश आहे . म्हणून मी सप्टेबर च्या पहिल्या दहा दिवसात ऑपरेशन चा सल्ला दिला.     

ठरल्याप्रमाणे  या जातकाच्या बहिणीने तिला हॉस्पिटलात दाखल केल व अत्यंत क्लिष्ठ, अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. त्या आनंदाच्या भरात जातकाच्या बहिणीने मला ही बातमी फोनवर कळवली.  आनंदाश्रू फोनमधून दिसत नसले तरी त्यांच्या भारावलेल्या आवाजातून नक्की जाणवत होते. 

अर्थात याच श्रेय जात ते डॉक्टरांनाच.  ज्यांनी अत्यंत कुशलतेने काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडली तेच खरे या श्रेयाचे मानकरी. 

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब