Monday 31 December 2012

बोरला पाणी लागेल का ?

प्रश्न कुंडली किती अचूक व बोलकी  असते त्याच हे उदाहरण. २६ नोवेंबर २०१२  ची  गोष्ट, त्या दिवशी कदम मावशीनी विचारल की घरी आपल्या बंगल्यात बोर केल तर पाणी लागेल का ? मी  त्यांच्या समोर टोकन ची पिशवी ठेवली. त्यांनी १७९ नंबरच टोकन काढल.  बाजूलाच १७९ नंबरची कुंडली दिली आहे

कुंडली बघताच लक्षात येईल कि प्रश्न किती मनापासून विचारला आहे व या जातकास त्याच उत्तरही किती अचूक मिळेल ते.

कुंडलीत चंद्र चतुर्थात म्हणजेच प्रश्न मनापासून विचारला आहे. चतुर्थाचा उप नक्षत्र स्वामी शनि दशमात, द्वितीयेश व तृतीयेश आहे. शनि राहूच्या नक्षत्रात, राहू लाभात, राहू गुरूच्या दृष्टीत, गुरु पंचमात, लग्नेश व चतुर्थेश, गुरु चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र  चतुर्थात व अष्ठमेश.

वरील जन्त्रीवरून लक्षात येते कि बोर होलला चांगले पाणी लागणारं. कारण  चतुर्थाचा उप  नक्षत्र शनि ज्या राहूच्या नक्षत्रात  आहे तो स्वत: लाभात असल्यामुळे बोरला पाणी लागणारच.  तस मी कदम मावशीला सांगितलं. त्यानंतर आठ दहा दिवसांपूर्वी त्यांनी फोन करून सांगितलं कि खूप चांगल पाणी लागल.

शुभं  भवतु !


आपला
नानासाहेब

Friday 14 September 2012

तडजोड होवून घटस्फोट होईल का ? divorce problem

।।  श्री ।।

नमस्कार मित्रहो !

मुंबईहून  एका जातकाचा फोन आला. "कोर्टात तडजोड होवून  माझ्या बाजूने निकाल लागेल का??? "

त्याच्या पत्रिकेप्रमाणे इतके दिवस वैवाहिक सौख्य कमी असल्यामुळे तसेच तीव्र स्वरूपाच्या मतभेदांमुळे प्रकरण  कोर्टात गेले. आता हे प्रकरण तडजोड होवून मिटेल कि तारीख पे तारीख, तारीख पे तारीख वगैरे वगैरे.....भिजत घोंगड पडेल म्हणून त्यान मला वरील प्रश्न विचारला होता.

मी फोनवरच त्याच्याकडून के पी सिड घेतला.  तो होता ६७. दिनांक ३१ ऑगस्ट २०१२, वेळ १६:२५:४० अशी.

हि प्रश्न कुंडली बाजूला दिलेली आहे त्यावर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.
 

षष्ठाचा उपनक्षत्र स्वामी राहू पंचमात, राहू गुरूच्या दृष्टीत , गुरु लाभात, षष्ठेश , गुरु चंद्राच्या नक्षत्रात चंद्र अष्ठमेश व चतुर्थेश, राहू शनीच्या नक्षत्रात शनी चतुर्थात , सप्तमेश व अष्ठमेश.

म्हणजे षष्ठाचा उपनक्षत्र स्वामी राहू  षष्ठ व लाभ स्थानाचा कार्येश आहे. त्यामुळे जातकाच्या बाजूने निकाल लागायला हरकत नाही. सध्या कुंडलीला राहुचीच महादशा सुरु आहे त्यामुळे राहु महादशा वरील प्रमाणे कार्येश आहे. आता फक्त अंतर्दशा कार्येश आहे का बघायला हव.  बुध द्वितीयात व व्ययेश, बुध केतूच्या नक्षत्रात, केतू लाभात, केतू रवीच्या नक्षत्रात रवी द्वितीयात, तृतीयेश आहे. म्हणजे बुध अंतर्दाशाही षष्ठ व लाभ स्थानाची  कार्येश आहे तसेच तृतीयेश हि असल्यामुळे या अंतर्दशेत निकाल जातकाच्या बाजूने लागणार.

वरील विश्लेषणानुसार मी त्याला म्हंटल तडजोड होवून जाईल व व कायदेशीर घटस्फोट मिळेल.

त्याची या पाच सप्टेबरला कोर्टात तारीख होती. त्यानंतर त्याचा सहा कि सात तारखेला नक्की आठवत नाही, सकाळी फोन आला म्हंटला "तुम्ही सांगितल्या प्रमाणे तडजोड होवून निकाल लागला घटस्फोट मिळाला. तुमच्या खात्यावर  मी ........ रक्कम जमा केली आहे. "

"रक्कम जमा करण्याची काय आवशकता होती. आपण यापूर्वी मला आपल्या जन्म कुंडली चे विश्लेषण करण्यासाठी फी दिली होती. " मी त्याला आठवण करून दिली. तसा तो फक्त हसला व म्हंटला "या पुढेही गरज लागल्यास मार्गदर्शन करा......."

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब

Friday 31 August 2012

दणक्या नंतर प्रसाद ..?

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

रात्री आठ साढे आठ ची वेळ होती. इतक्यात गणेश आला. अर्थात तो मित्रच आहे. तो जसा मित्र आहे तसा जातकही आहे.  जातक ह्या अर्थी कि तो  वेळोवेळी ज्योतिष मार्गदर्शन घेण्याकरिता येत असतो म्हणून. आल्या आल्या त्यान  सांगितलं आपला एक प्रश्न बघायचाय तुझ हातातलं काम संपव मग विचारतो.

त्यान अस म्हंटल्यावर मी माझ हातातल काम संपवलं. "बोल काय प्रश्न आहे ?"

"सोनीची एजन्सी मिळेल का. ? "

"तुझ्याकडे तर सोनी ब्रांड होताच ना ? आता पुन्हा डीलरशिप  म्हणजे  हा काय प्रकार आहे ? " माझा  जरा गोंधळच उडाला. याच इलेक्ट्रोनिक्सच शोरूम आहे. त्यात हा सगळ्या वस्तू नावाजलेल्या कंपनीच्याच ठेवतो म्हणजे सर्विसला ला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही अस तो म्हणतो.

"इथल्याच एका डीलरने  काडया केल्या होत्या. आत्ताच त्याला जाम धुतला. तिकडनच  येतोय. त्या भडव्याला धुतला म्हंटल्यावर कंपनी आपल्याला माल देणार कि नाही ते बघ." त्यान एका दमात सांगितलं  


"ओ के ! काढ टोकन " मी टोकनची  पिशवी पुढे करत म्हंटल.

त्यान टोकन काढल. नंबर होता १७६

मी तो के पी सिड घेवून संघनकावर प्रश्न कुंडली टाकली. ती बाजूलाच दिलेली आहे.


कुंडली संघनकावर छापून आली चंद्र लाभात दिसताच जरा हायस वाटलं.


या कुंडलीचा लाभाचा उप नक्षत्र स्वामी शनी असून शनी दशमात, द्वितीयेश व तृतीयेश आहे. तसेच शनी  मंगळाच्या नक्षत्रात मंगळ दशमात, व्ययेश व पंचमेश आहे. शनी तृतीयाचा कारक आहे. तसेच तो मंगळाच्या माध्यमातून व्ययेश आहे. म्हणजे खर्च होणारच.

मी त्याला म्हंटल "खर्च होईल "

"माल घ्यायचा म्हंटल्यावर खर्च होणारच ना . इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार " त्यान त्याच गणित सांगितलं.

"ठीक आहे" अस म्हणून मी तृतीयाचा उप नक्षत्राकडे लक्ष केंद्रित केल.


तृतीयाचा उप नक्षत्र स्वामी गुरु असून गुरु षष्टात, लग्नेश व चतुर्थेश आहे. गुरु चंद्राच्या नक्षत्रात. चंद्र लाभात व व्ययेश आहे. तृतीयाचा उप नक्षत्र लाभाचा मजबूत कार्येश आहे तसेच लाभाचा उप नक्षत्र तृतीयाचा कार्येश आहे. त्यामुळे  काम होणार हे लक्षात येत.

आता डीलर शिप कधी मिळणार ? किती दिवसात कंपनीचा माल सुरु होणार वगैरे वगैरे ?

सध्या कुंडलीला शनीची महादशा व  केतूची अंतर्दशा  सुरू आहे. केतूची महादशा १८ सप्टेंबर पर्यंत आहे. शनी लाभाचा व तृतीयाचा कार्येश आहेच आता फक्त केतू अंतर्दशेत हे कार्य होणार का ?

केतू पंचमात आहे, केतू - मंगळ व चंद्राच्या दृष्टीत, मंगळ दशमात द्वितीयेश व पंचमेश मंगळ चंद्राच्या              उपनक्षत्रात चंद्र लाभात व व्ययेश, तसेच चंद्र शनीच्या नक्षत्रात त्यामुळे चंद्र लाभाचा व तृतीयाचा मजबूत कार्येश होतो.

एकंदर स्थिती पाहता मी गणेशला म्हंटल. " १८ सप्टेंबर पर्यंत  काम हो जायेगा."

त्यान पुन्हा  खरच का वगैरे विचारल  नाही. कारण त्याला यापूर्वी आलेले अनुभव.

वरील घटना २४ ऑगस्ट ला घडली व ३० ऑगस्टला रिप्लाय आला. त्याची  अन कंपनीची बोलणी यशस्वी   होवून  त्याला पूर्ववत सोनीच्या मालाचा पुरवठा सुरु झाला. 

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब

Tuesday 28 August 2012

होता गर्भधारणा अशुभ वेळी संतती होई वेडी खुळी !

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

संतती सौख्य हा प्रत्येक  कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संतती होण न  होण पूर्व संचिताचा विषय आहे. संतती नसण  हे तर दुख: आहेच पण असूनही डोंगरा एव्हढे दुख: भोगण्याची   वेळ  आली  तर....

विभिन्न  समाजातील  लोक मतीमंद, वेडी , खुळी  संततीच दु:ख भोगत आहे. अनेक लोक या दु:खातून गेलेत, अनेक जात आहे., अनेक पुढेही जातील. पूर्वीच्या काळी वैद्यकीय सेवेअभावी असले प्रकार  घडत  असावेत असे मानले तरी आजच्या काळात जर अशा प्रकारची संतती जन्माला  येत असेल तर त्याला काय  म्हणाव

बर आजही काही लोक अशिक्षित, असंस्कृत  आहेत त्यांच्या वाट्याला असला   प्रकार आला तर आपण म्हणू  शकतो कि अज्ञानामुळे  त्याचं  काही  चुकल   असेल. पण आईवडील चांगले सुसंस्कृत, बुद्धिमान, असूनही जर त्यांच्या  पोटी एखादे मतीमंद, खुळे , वेडे, मुल जन्माला येत असेल तर ? 
  
या प्रश्नावर येवून मती कुंठीत होते, काही लोक याला अपवाद म्हणतील, अपवादात्मक गोष्टी घडतच असतात. पण या पाठीमागे  खरच काही कारण  असतील तर अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .

अशा प्रकारे  मुल जन्माला  आले तर आयुष्यभर दु:ख भोगाव लागत . त्या मुलाची सेवा करावी लागते. आयुष्य जगण्यातील आनंद हिरावला जातो . 

भारतीय ऋषीमुनींनी या बाबतीत सखोल चिंतन करून त्याबद्दल काही नियम केलेले आहेत. या नियमांचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा किंबहुना केलाच पाहिजे. 

अशी मुले कश्यामुळे जन्माला येतात याच रहस्य त्या मुलाच्या  कुंडलीतील  ग्रहयोगाच्या  माध्यमातून दिसून येते. मतीमंद आणि खुळी संतती  होण्याच  कुठलही  स्पष्ट कारण माता पित्यांच्या कुंडलीत दिसत नाही. 

पूर्वीच्या काळी राजघराण्यात , विद्वान कुटुंबात मनोवांच्छित संतती करिता विधीपूर्वक कर्म केले जात असे. त्याचे रिझल्ट्स सुद्धा तसेच चांगले मिळायचे.  

लोकांनी आजकाल ब-याच  चांगल्या गोष्टी ज्या षी मुनींनी सांगितल्या होत्या त्याही कर्मकांड म्हणून बाजूला सारल्या आहेत किंवा दूर केल्या आहेत.
 

अष्टमी ,  ग्रहण काळ, अमावस्या, पोर्णिमा, या तिथी गर्भधारणेच्या दृष्टीने   अयोग्य, अशुभ असतात.

1 तुकालाच्या  तीन  रात्री
२ अमावस्या
३ पौर्णिमा
4 एकादशी
५ प्रदोष काल
६ ग्रहण काल
७ कुटुंबातील
श्राद्ध विधी
पर्वाच्या दिवसात

उगाच विषाची परीक्षा न पाहता वरील  सांगितलेला कालावधी टाळा व  शिस्त पाळा नाहीतर आयुष्यभर न संपणार दु:ख  वाट्याला येऊ शकते .

 शुभं भवतु

आपला
नानासाहेब

Tuesday 21 August 2012

जगी सर्व सुखी असा कोण आहे ...?

!! श्री !!
नमस्कार मित्रहो

काल  एका जातकाची   कुंडली  बघितली . कुंडलीचा  अभ्यास   चालू  असताना  त्या   पत्रिकेतील  विशेष  बाब  जी  नजरेस  आली .  तिचेच  विश्लेषण  करतोय .  जातकाचा   प्रश्न  विवाह  संबंधी  होता  त्याच  उत्तर दिल्यानंतर माझ इतर गोष्टींकडे लक्ष गेल अन चमकलोच. त्याची कुंडली मी बाजूला दिलेली आहे. गुप्ततेमुळे नाव वगैरे काढून टाकलय. अर्थात हा काही खूप खाजगी विषय नाही म्हणून मी तो ब्लॉग वर टाकत आहे.  

कुंडलीच निरीक्षण करताच लक्षात येईल कि पाच पाच ग्रह  तृतीयाचे कार्येश होतात. बुध, गुरु ,शुक्र , चंद्र तृतीयात, शनी तृतीयेश.  

जन्म १९८७ चा.  शनीची महादशा १९९१ ते २०१० पर्यंत कार्यरत. शनी व्ययात, द्वितीयेश, तृतीयेश तसेच शनी बुधाच्या नक्षत्रात, बुध तृतीयात.  त्यानंतर येणारी महादशा केतूची, ती २०३४ पर्यंत कार्यरत आहे. केतू चंद्राच्या दृष्टीत, चंद्र तृतीयात - गुरूच्या नक्षत्रात, गुरु तृतीयात व  लग्नेश, केतू चंद्राच्या नक्षत्रात चंद्र तृतीयात. त्यानंतर येणारी महादशा शुक्राची, शुक्र तृतीयात, षष्ठेश, दशमेश व  लाभेश ,   तसेच शुक्र शनीच्या नक्षत्रात, शनी व्ययात, द्वितीयेश व तृतीयेश. हि महादशा २०५४ पर्यंत कार्येश.    

 त्यानंतर येणारी दशा रवीची ती २०६० पर्यंत कार्येश. रवी सप्तमात व नवमेश, रवी केतूच्या नक्षत्रात. केतू वरील प्रमाणे कार्येश.

एकंदरीत हि जंत्री बघता मी जातकाला विचारल कि या व्यक्तीच शिक्षण घराबाहेर दूर झाल का ? त्यांनी लगेच होकार दिला. आणखी पुढे सांगत मी म्हंटल. "हि व्यक्ती नोकरी सुद्धा घरापासून दूर राहूनच करीन. याला वाहन सौख्य कमी मिळेल"

त्यावर लगेच त्यांनी सांगितलं "हो आम्ही दोघे एकाच कंपनीत नोकरीला लागलो, पण काही महिन्यातच तो कंपनी सोंडून दुसरीकडे जॉईन झाला, शिक्षणातही त्याला अडचणी आल्या होत्या." 

माझ्या  समोर जे जातक बसले होते मी त्यांना विचारल " हे सगळ तुम्हाला कस माहित "
"कारण तो माझा चुलत भाऊच आहे." त्यांनी सांगितलं.
 
"याला वाहन सौख्य कमी मिळेल, राहती घर बदलतील. म्हणजेच गृह सौख्य कमी मिळेल" मी पुढे सांगितलं.
 
 "त्याला अजून निट गाडी चालवत येत नाही, खूप कमी वेळा तो गाडी वापरतो." 

"असच होणार अगदी २०६०  पर्यंत तो  प्रवास खूप करणार कारण त्याचा तृतीय भाव मजबूत लागलाय." मी विश्लेषण करून सांगितलं.

"ज्योतिष शास्त्र इतक्या खोलात जावून मार्गदर्शन करू शकत ? मला विशेष वाटतंय " तो म्हणाला.

"हो. अनेक गोष्टींचा मागोवा या शास्त्रातून घेता येतो. खरतर यात विशेष काहीच नाही. कोणीही व्यक्ती जी कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यासक आहे ती सांगू शकते. त्या व्यक्तीमध्ये काही दैवी शक्ती किंवा विशेष शक्ती असते अस नाही. हे उपकार ज्योतिष शिरोमणी  कृष्णमुर्तिनी करून ठेवलेत." त्याला सांगताना मला खरच आतून ज्योतिष मार्तंड कृष्णामुर्तींचा अभिमान वाटत होता. 

या कुंडलीच वैशिष्ट काय आहे कळल का ?  ज्या सुखासाठी मनुष्य आयुष्यभर धडपडतो, काबाड कष्ट करतो, एक नंबर दोन नंबर करतो तेच सुख जर माणसाला मिळणार नसेल तर......?  

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब


Tuesday 7 August 2012

विवाह ...? कधीच नाही...



|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

माझे एक जातक एका वृद्ध व्यक्तीबरोबर कार्यालयात आले. नमस्कार वगैरे करून इतर जुजबी बोलण झाल्यावर त्या जातकाला विचारल.

"बोला..  कोणाची समस्या आहे?"

"यांच्या मुलीचा विवाह योग कधी आहे ते सांगा ." त्यान त्या वृद्धाकडे बोट करत म्हंटल.

"आज नाही सांगू शकत." मी त्यांना त्या वेळेस खरच वेळ देवू शकत नव्हतो.

"अस नका करू खूप अर्जंट आहे, तस नसत तर यांना मी घेवून नसतो आलो. मला एकट्यालाही येता  येत होत. पण आपल्या  भेटीची वेळ अगोदर न घेतल्यामुळेच  मी यांना घेवून आलो." वृद्धाने विनंती केल्यावर मग नाईलाज झाला, मी माझ्या हातातील काम बाजूला ठेवले.

"माफ करा,  पण  अस मधेच येणा-याला जर मी वेळ दिला तर आधीच्या जातकांच काम माग पडत. म्हणून मी नाही म्हणतो इतकच" मी माझी अडचण सांगितली.

"खर तर फोन करूनच येणार होतो पण तुमच्या बद्दल यांनी इतक सांगितलं कि मग वाट पाहण्याचा धीर धरवला नाही. कारण तुम्ही आठ, पंधरा दिवसा नंतरची वेळ दिली  असती व इतके दिवस   थांबण   मला आता शक्य नाही." वृद्धाने खर काय ते सांगितलं.

मी अधिक न बोलता त्यांच्या मुलीची भाव चलित कुंडली मांडली.

पत्रिका बाजूला दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

सध्या  जाताकास  गुरूची  महादशा सुरु असून ती २०१५ पर्यंत कार्येश आहे. गुरु तृतीयात, व्ययेश तसेच लग्नेश आहे. गुरु रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात, रवीची सिंह राशी लुप्त. गुरूची दृष्टी अष्टम, दशम व व्यय स्थानावर. म्हणजेच  गुरु हा ग्रह कुठल्याच प्रतीने विवाहाचा कार्येश नाही. त्या नंतर येणारी महादशा शनीची आहे ती २०३४ पर्यंत कार्यरत आहे. शनी षष्टात  व लग्नेश आहे तसेच  शनी  बुधाच्या नक्षत्रात, बुध व्ययात, षष्टेश  व अष्टमेश आहे. शनीची दृष्टी नवम , लग्न व चतुर्थावर आहे. त्यामुळे शनी सुद्धा विवाहाचा कुठल्याही प्रतीचा कार्येश होत नाही. 

सध्या मंगळाची अंतर्दशा सूरु आहे ती ऑगस्ट  २०१२ पर्यंत कार्येश आहे.  मंगळ  रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात. त्यामुळे हि अंतर्दाशाही काही कामाची नाही. पुढे येणारी अंतर्दशा राहूची आहे. राहू सुद्धा गुरूच्या दृष्टीत त्यामुळे हि अंतर्दशा सुद्धा विवाहासाठी पोषक नाही. हि अंतर्दशा २०१५ पर्यंत कार्येश आहे. त्यानंतर शनीची महादशा लागेल. शनी महादशेत तीन वर्ष शानिचीच अंतर्दशा राहील. तोपर्यंत २०१८ येईल. मग बुधाची अंतर्दशा लागेल.ती सप्टेबर २०२०  पर्यंत आहे. आता बुध कसा कार्येश होतो ते पाहू. बुध व्ययात, षष्टेश , अष्टमेश आहे तसेच बुध रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात. म्हणजे हि अंतर्दशाही लग्नासाठी उपयोगाची नाही. तोपर्यंत मुलीच वय ४३ होईल.

 वरील जंत्रीवरून एक लक्षात आल कि जातकाच्या तीनही महादशा विवाह घडवून आणण्यास पोषक नाहीत व एकही अंतर्दशा बलवान नाही.

आता मी सप्तम स्थानावर लक्ष केंद्रित केल. सप्तमात एकही ग्रह नाही. सप्तमाचा अधिपती चंद्र आहे. चंद्राच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही. चंद्राच्या उप नक्षत्रात फक्त केतू आहे. केतूची महादशा २०५१ नंतर सुरु होईल. त्यावेळी मुलीच वय ७४ असेल म्हणजे विषयच संपला. मग केतूच्या अंतर्दशेत विवाह होईल का. ?

केतूची अंतर्दशा २०१५ नंतर सुरु होईल. मग मी केतू कसा कार्येश होतो ते पाहिलं.

केतू द्वितीयात, केतू मंगल व शनीच्या दृष्टीत, म्हणजेच केतू हा सप्तमाचा अगदीच मजबूत कार्येश होत नाही. त्यामुळे या दशेतही लग्न होणार नाही.  जर  केतू दशाही  लग्नास  कारक  नाही  तर  मग याचा  अर्थ  अगदी  स्पष्ट  आहे. लग्न  होणार नाही.

मी गंभीर झालो. आता हि गोष्ट त्या वृद्ध पित्याला सांगण मला खूप जड गेल.

मी त्यांना सांगितलं. "मुलीच्या पत्रिकेत विवाह योग नाही."

"काय???" त्यांना  एकदम धक्काच बसला.

"होय,  पण तुम्ही प्रयत्न करू शकता, देव करो न माझ भविष्य चुको" मी त्यांना थोडा धीर देत म्हणाला. शेवटी काय तर डॉक्टर हि अगदी शेवटच्या वेळेस रुग्णाच्या नातेवाईकांना  असच सांगतात , अब  दवा कि नही दुवा कि जरुरत हैं.

थोडावेळ सुन्न अवस्थेत गेला. नंतर ती व्यक्ती सावरली. अन म्हणाली "गेल्या दहा  वर्षांपासून मी मुलीच्या लग्नासाठी  प्रयत्न करतोय. सगळ्यांनीच मला सांगितलं कि या वर्षी लग्न होईल. पुढच्या वर्षी होईल पण नाही झाल  हो. अस का ?"

या काच उत्तर मला माहित आहे. पण मी त्यांना ते समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही........

"प्रेम विवाह, अंतर जातीय अस काही आहे का? कारण ती कॉलेज ला प्रोफेसर  आहे   म्हणून   म्हंटल  " त्यांनी अंधुक आशेन विचारल.

"नाही. विवाहाचा  योगच नाही" मी जास्त खुलासा न करत सांगितलं. 

"याला काही उपाय ?" त्यांनी पुन्हा विचारल.

नाही. याला काही उपाय नाही. आडात नसेल तर पोहो-यात कुठून येणार. उपाय तेंव्हाच फलित होतात जेंव्हा त्या विषयाबद्दल काहीतरी  स्पार्क असेल. अन्यथा सर्व उपाय निरुपयोगी ठरतात.

"ठीक आहे. दैवाच्या मनात जे असेल ते होईल" अस म्हणत ते उठले. ....

शुभं भवतु !


आपला
नानासाहेब

Tuesday 24 July 2012

राहु भयंकर ....


!! श्री !! 

पलीकडून बोलणारा तरुण हुंदके देवून रडत होता. मी त्याच्या कुंडलीच  विश्लेषण समजावून सांगत होतो. म्हणजे मी त्याला खूप काही भयंकर सांगत होतो व म्हणून तो रडत होता अस नाही. तर तो ज्या परिस्थितून जात होता ती परिस्थिती  किती भयंकर आहे हे तो मला सांगत होता व ते सांगताना त्याला रडू आल होत. 

हार्डली चोवीस पंचवीस वय,  उत्साहानं सुरु केलेल्या बिझनेस (तो तरुण गुजरातचा आहे) मध्ये अपयश,   अश्या कोवळ्या वयात २५ ते ३० लाखाच कर्ज डोक्यावर,  घेणेकरांचा  तगादा मागे लागलेला, परतफेड  अशक्य होवून बसलेली,  अश्या असहाय्य परिस्थितीत  कितपत टिकणार तो. 

त्याची पत्रिका बाजूलाच देलेली आहे. त्यावर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

पत्रिकेतून मी नाव गुप्त रहाव म्हणून ते काढून टाकल आहे. या लिखाणाचा उद्देश फक्त इतरांनी जीवनात सुखी आयुष्य जगताना कश्या प्रकारे काळजी घ्यावी हा आहे. काहीना वाटत कि मी  ब्लॉग वर विश्लेषण करूनच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो कि काय ? ब्लॉग वर मी फक्त काही विशेष घटना ज्या मी सांगलीतल्या प्रमाणे घडून आलेल्या असतात शिवाय त्या   अजिबात  खाजगी वगैरे नसतात  अश्याच टाकतो   आणि मी त्यांच्या परवानगीशिवाय त्या लिहित नाही.  असो. 

सध्या त्याला राहूची महादशा  आहे. राहू महादशा २०१० ला  सुरु झाली ती २०२८  पर्यंत कार्यरत राहील. अंतर्दशाही राहुचीच सुरु आहे. राहू स्वत: व्ययात, राहू  शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र लाभात व षष्टेश आहे,  राहू ज्या राशीत  आहे त्याचा राशी स्वामी मंगळ व्ययात, सप्तमेश व   रवीच्या नक्षत्रात, रवी व्ययात व चतुर्थेश. 

वरील जंत्री  वरून काय लक्षात येत बघा.  मंगळ व्ययात , रवी व्ययात , त्यांच्या जोडीला राहू. कर्जबाजारी होणार नाही तर काय होणार ? अश्या दशेत दवाखाना, तुरुंगवास, अनेक चिंता, अप्रिय घटनांची मालिका,  या आणि अशा अनेक गोष्टीच वाट्याला येतात. अक्षरशः घर, गाव सोडून परागंदा व्हाव लागत. अगदी विजनवासात जाव लागत.  कधी कधी अर्ध आयुष्यच कर्जाची परत फेड करण्यात निघून जात. 

अश्या महादशेत व्यवसाय करण्याचा निर्णय घेणच मुळी घातक होत. पण अज्ञान म्हणा कि आणखी काही त्याला वेळेवर मार्गदर्शन उपलब्ध झाले नाही हे मात्र तितकच खर.  

फक्त राहुबद्दल लिहायचं म्हंटल तर स्वतंत्र ग्रंथ निर्मिती होईल. कारण तो छाया ग्रह आहे. ज्योतिष शिरोमणी कृष्णामुर्तिनी आपल्या संशोधनात छाया ग्रहांना जेव्हढ  महत्व दिलय तेवढ अन्य कुणी दिल नसेल कदाचित. 

राहू स्वता:ची फले देतोच पण तो ज्या ग्रहाबरोबर असतो त्याचीही फले तीव्र करतो. 

बर हि  महादशा थोडी थोडकी नसते. १८ वर्षा चा  प्रदीर्घ कालावधी असतो हा. ती जर अशी ऐन तारुण्यात आली तर माणसाला देशोधडीला लागण म्हणजे काय याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. अर्थात प्रत्येक स्थानातला राहू अशीच फले देतो अस नाही. 

मी त्याच सांत्वन केल. त्याला त्यावर राहूचा तोडगा सांगितला व व्यवसायाच्या मागे न लागता छानशी नोकरी करायला सांगितलं. कारण राहू शुक्राच्या  नक्षत्रात  आहे. शुक्र लाभात तसेच षष्टेश आहे. नोकरी करून हळू हळू कर्ज फेड होईल, आणि कसलीही  जी मस्ती न करता हा कालावधी साधनेत घालवावा जेणे करून आयुष्याच मातेरं  होणार नाही.

शुभं भवतु  ! 

 आपला 
नानासाहेब 

Saturday 21 July 2012

कर्माची निवड .......

आयुष्याच्या वाटेवरील अत्यंत महत्वाच वळण म्हणजे आयुष्यभर  आपण काय कर्म करणार ते ठरण किंवा ठरविणे. काहींच हे आपोआप ठरत तर  काहीना ठरावाव लागत. एकदा दिशा निश्चित झाली कि फक्त चालायचं. पण काही लोक असे असतात ज्याचं आयुष्य फक्त काय करायचं हे  ठरविण्यातच  जात. 

कुंडलीतील दशम भाव जातकाच कर्म निश्चित करतो. शनीचा दशम भावाशी कुठल्याना कुठल्या स्वरुपात जर संबंध येत असेल तर साधारणपणे ३५ -४० नंतरच स्थिरत्व येत. तो पर्यंत अनेक नोक-या व्यवसाय बदलतात. शनी परीक्षा घेतो, कसोटीच म्हणाना पण नंतर शनी अगदी भरभरून देतो. पण मधला जो काळ जातो त्या काळात मनुष्य तावून सुलाखून निघतो.  त्यामुळेच  नंतर येणा-या सुवर्णकाळाचा उपभोग त्याला घेता येतो. नाहीतर भरभराट असली कि अनेक लोक उधळ मानके पणा करतात. मी पणा वाढून जातो. बरीच मंडळी सुसह्य जगन असह्य करून घेतात, स्वत:चही करतात व आपल्या आप्तस्वकीयांचही  करतात. 

काल केशवराव आले. त्यांची कुंडली माझ्याकडे संघनकावर  आहेच.  यावेळेस प्रश्न जरा वेगळा होता. त्यांच्या नोकरी व्यवसायाबद्दल चर्चा करण्यासाठी ते आले होते. 

केशवरावचा   प्रश्न होता नोकरी व्यवसायात  स्थिरत्व कधी येणार ? व्यवसाय कुठला करावा ? वगैरे.  

त्यांची पत्रिका बाजूला दिलेली आहे. आपण त्यावर टीचकी मारून ती मोठी करून पाहू शकता. 

सध्या गुरूची महादशा सुरु असून ती २०१४ पर्यंत कार्येश आहे. गुरु ५  ११ चा कार्येश असून तो राहूच्या उप नक्षत्रात आहे. राहू द्वितीयात आहे. राहू मंगळाच्या दृष्टीत, मंगळ ८  ९  १०  २ तसेच तो चंद्राच्या उप नक्षत्रात , चंद्र लाभात तसेच तो षष्ठाचाही  बलवान कार्येश आहे. राहू शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र २  ३  ४  ८.

वरील जंत्रीचा विशेष अभ्यास करावा लागला. कारण पुढील येणारी महादशा शनीची आहे. शनी १  १२ चा कार्येश असून तो रवीच्या नक्षत्रात आहे. रवी १  ७ चा कार्येश. 

पत्रिकेतील गुरु, मंगळ, राहू, केतू हे  चंद्राच्या  माध्यमातून  षष्ठाचेच    मजबूत कार्येश होतात,  त्यामुळे त्याचाच व्यवसाय निवडला. शेती, दुग्ध व्यवसाय, रविमुळे पेस्टी सायीड या व्यवसायांमध्ये त्यांना उत्तम यश राहील. 

अस  सांगितल्यावर त्यांनी त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. 

" शेतीत आजवर आपल्याला नुकसान झालेलं नाही. तसेच शेतात ज्या ज्या भागात मी फिरतो त्या त्या भागातील पिक भरघोस  येत. ज्या भागात मी फिरत नाही तिकडे खास रिझल्ट मिळत नाही." अनुभव सांगताना केशवराव  भूतकाळात  गेले.

"तसेच एकदा मी शेतात बोर मारलं. पाणी कुठे लागेल हे दाखवणारा  पानाड्या हि आणला होता. पण बोर फेल  गेल. नंतर मीच शेतात एक चक्कर मारला व बोर मारणा-याला मी स्वत:च जागा दाखवली. त्या जागेवर असा पाय ठेवला व बोर मारणा-याला  सांगितलं,  मार बोर. त्यान बोर मारताच काय आश्चर्य ? चांगल पाणी लागल . त्यावेळी मला विशेष वाटलं होत. पण आता लक्षात येतंय अस का झाल ते. " केशवराव रंगात  येवून सांगत होते. 

"अहो S  S चंद्र हा जल तत्वाचा कारक असल्यामुळे तुम्हाला हे शक्य झाल." मी  चंद्राच कारकत्व त्यांना समजावून सांगितलं. 

"आता लक्षात येतंय." त्यांनी हसून मान  हलवली. 

"याच व्यवसायात लक्ष घातल   तर धनार्जन उत्तम असेल काळजी करायच कारण नाही,   षष्टातील चंद्रा मुळे तुम्हाला सर्दीचाही त्रास जाणवेल. काही लोकांना हि सर्दी बारमाही सर्दी असते."  मी त्यांना चंद्रामुळे काय विकार होवू शकतो ते सांगितले. 

"आहे,   मला सर्दीचा त्रास अगदी पहिल्या पासून आहे. याचा संबंध कुंडलीतील ग्रहांशी येतो हे मला आजच कळतंय. " त्यांनी दुजोरा  दिला 

"म्हणूनंच तुम्ही आता दुस-या कुठल्याही व्यवसायात लक्ष घालू नका. यातच उत्तम यश मिळेल. उगाच हे करू का ते, एक ना धड भाराभर चिंध्या काय कामाच्या " मी स्पष्ट काय ते सांगितलं. 

"नाही आता स्वानुभवाने लक्षात आलय. डोक्यातला गोंधळ संपला. आता पूर्ण लक्ष मी शेती आणि दुग्ध व्यवसायात घालतो." केशवराव  मोकळेपणाने हसत म्हणाले. 

शुभं भवतु ! 

आपला 
नानासाहेब

Tuesday 3 July 2012

बाळाच्या जन्माचा मुहूर्त....

!! श्री !!
नमस्कार मित्रहो !

रात्री नऊ साडेनवू ची वेळ असेल. कार्यालय बंद  करून घरी निघालो होतो. जेवणाची वेळ झाली होती. पाऊल घराच्या दिशेने भर भर पडत होती. कदाचित सपाटून लागलेल्या भूकेचाही परिणाम असावा तो. शिवाजी चौकात रस्ता ओलांडताना फोन आला. "नमस्कार मी ....... बोलतोय ...ओळखल का ? ..... , मिसेसला दवाखान्यात  डीलेवरी  साठी भरती केलय....डॉक्टर सीझर करायचं म्हणतात,  दोन दिवसाची मुदत दिलीय.   मुहूर्त सांगा..........!"

त्याच फोनवर नाव ऐकताच त्यांची केस क्षणार्धात नजरेसमोर येवून गेली..........


१ नोवेंबर २०११  ला दोन महिला कार्यालयात आल्या होत्या.


"हि माझी मुलगी. हिला आधी एक मुलगा आहे. आता सध्या दिवस गेलेत. डॉक्टरांनी ५ मे २०१२ हि तारीख दिलीय, डीलेवरी नॉर्मल होईल कि सीझर. काही त्रास तर होणार नाही ना ? " त्या मुलीच्या आईने विचारल


" डॉक्टरने काय तारीख दिलेली आहे." मी विचारल
"५  मे  २०१२" मुलीने सांगितले. 

पत्रिका बाजूला दिलेली आहे. त्यावर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. गुप्ततेमुळे मी कुंडलीतून नाव काढून टाकले आहे. 

सध्या जाताकास शुक्राची महादशा सुरु असून गुरूची  अंतर्दशा २०१४ पर्यंत कार्यरत आहे. शुक्र ९  १  ८ असून तो राहूच्या नक्षत्रात आहे. राहू ४. राहू शनीच्या दृष्टीत, शनी २ ४ ५, शनी केतूच्या नक्षत्रात,  केतू १०.  केतू बुधाच्या युतीत, बुध ११ १२ ९ तसेच बुध शुक्राच्या नक्षत्रत, शुक्र ९ १ ८.  

वरील जंत्रीचा अभ्यास करता असे लक्षात येते कि शुक्र प्रथम स्थानाचा व अष्टम स्थानाचा  मजबूत कार्येश आहे. म्हणजेच शुक्र कुटुंब स्थानाच्या व्ययात आहे. तसेच शुक्र अष्ठ मेशही  आहे त्यामुळे शारीरिक त्रास संभवतो. शुक्र राहूच्या नक्षत्रात व राहू स्वत: चतुर्थात. तसेच शनीच्या दृष्टीत व शनिसुद्धा  चतुर्थेश. राहू व शनी दोन्ही चतुर्थ स्थानाचे म्हणजे संतती सौख्याच्या विरोधात कार्य करणार सहजा सहजी हे सौख्य प्राप्त होणार नाही. तसेच राहू व शनी गर्भपात वगैरे सारख्या घटना घडवून आणू शकतात. 

हे सर्व लक्षात आल्यावर मी त्यांना महिनाभर आधी पासूनच सावध  राहण्यास सांगितले.  विशेष काळजी घेण्यास सांगितले. डॉक्टर ने दिलेल्या तारखेला हि प्रसूती होणार नाही त्याआधीच होईल. म्हणजेच              "प्री म्यचूअर्ड  डिलिवरी". हे ऐकून त्यांना धक्काच बसला. म्हंटल्या "काही वाईट तर नाही ना ? " 

"काळजी घ्यावी  लागेल. वाईट वगैरे काही होणार नाही. कारण शनी पंचमेशही आहे. तसेच ज्या अंतर्दशेत प्रसूती होणार ती गुरूची आहे. गुरु ७  ३  ६ आहे तसेच गुरु चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र २ १० . चंद्र कुटुंब  स्थानाचा बलवान कार्येश त्यामुळे प्रसूती होवून कौटुंबिक सौख्य वाढणारच यात शंका नाही. 

"काय होईल ?" मुलीच्या आईचा प्रश्न. 

"काही झाल तरी काय फरक पडतो. आता तुम्ही काही करू शकता का ?" 

"नाही हो, फक्त उत्सुकता म्हणून विचारल "

मी येणारी विदशा बघितली तीही गुरूचीच होती. गुरु चंद्राच्या माध्यमातून द्वितीयाचा बलवान कार्येश आहे.  

चंद्र कुटुंब स्थानी मंगळाच्या वृश्चिक  राशीत, मंगळ पंचमात. चंद्र गुरूच्या दृष्टीत. काय होईल. ? 

"पेढे दयायला विसरू नका" मी त्यांना चकित करण्याच्या उद्देशाने म्हंटलो.  

"आम्हाला मुलगी हवी होती. " अस सांगून त्यांनी मला चकित केल. 

"देव करो अन तुमची इच्छा पूर्ण होवो. " मी सांशकपणे आशीर्वादपर बोललो. 

"..............आता मी रस्त्यात आहे. डॉक्टरने दोन दिवसांची मुदत दिलीय ना ?" 

" हो " फोनवरच्या व्यक्तीने सांगितले. 

"उद्या सांगतो. " अस  म्हणून मी फोन वरच  संभाषण थांबवलं. 

दुस-या दिवशी सकाळी त्यांना दुपारचा मुहूर्त सांगितला ती तारीख होती डॉक्टरने दिलेल्या तारखेच्या १७ दिवस आधीची,  १८ एप्रिल २०१२. 

त्याच दिवशी दुपारी दीड दोन च्या दरम्यान त्या मुलीच्या पतीचा फोन आला. "डिलिवरी सुखरूप पार पडली. सिझरच झाल. आणि मुलगा झाला. पेढे घेवून येतो....... 

शुभं भवतु !


आपला 
नानासाहेब

Friday 22 June 2012

बदली होईल का ?

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

बोरीवलीहून दीप्तीचा फोन आला "सर मी तुमच्या खात्यावर फी जमा केली आहे. माझ्या बहिणीच्या काही अडचणी आहेत त्या बघा". दीप्ती म्हणजे आधी फी ट्रान्स्फर करणार मग  इ-पत्राने जे काही कोणाचे प्रश्न असतील ते. 

दीप्तीच  इ पत्र  एप्रिल महिन्याच्या २८ तारखेला  मिळाल.  बहिण वैशालीच्या  संदर्भात. ती सरकारी नोकरीत नुकतीच रुजू झाली. पण पोस्टिंग मात्र कुठे मिळाव तर औरंगाबाद. आता ?  झाली का पंचायीत ? संसाराच  बस्थान सगळ मुंबईत.  अन अश्यात नोकरीच्या निमित्तानं स्थलांतर. हरे राम s s ...  सगळच  विस्कळीत. नवीन नोकरीत रुजू झाल्यानंतर, तेही सरकारी म्हंटल्यावर तात्काळ बदली होण अवघडच. जे ह्या अनुभवातून गेलेत तेच या त्रासाच मुल्यांकन करू शकतात.    नको त्याच तोंड पाह्यला लागत. फालतूतल्या फालतू माणसालाही विनंत्या कराव्या लागतात. संताप, चीड आणि तीही व्यक्त  करता   येत नाही हि आपली मजबुरी एव्हढच काय ते आपल्या हातात.... अर्थात हि सगळी झाली बाहेर बाहेरची कारणं.    खरा प्रकार मात्र वेगळाच असतो. ... आवो देखते है  ग्रहों  का खेल..... 


प्रश्न : सर !.. गेल्या एक महीन्या पासून बदली साठी प्रयत्न चालु आहेत. पण अजुन यश येत नाही. कधी पर्यंत होइल ते सांगा. ?

बाजुलाच तिची पत्रिका दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.

सध्या जाताकास गुरूची महादशा सुरु असून ती २०२३ पर्यंत कार्यरत आहे. गुरु  १२  ५  ८  तसेच गुरु केतूच्या नक्षत्रात केतू ६, केतू  मंगळाच्या दृष्टीत, मंगळ १२ ४  ९ , मंगळ केतुच्याच नक्षत्रात. 

अंतर्दशा शनीची सुरु असून हि दशा १३.०६.२०१२ पर्यंत कार्यरत आहे.  शनी १  ६  ७ शनी रवीच्या नक्षत्रात, रवी ६  १ 

वरील जंत्रीच सूक्ष्म अभ्यास करता अस  लक्षात  येईल कि नवमेश मंगळामुळे आधीच्या नोकरीत बदल. झाला. अंतर्दशास्वामी शनी रवीच्या माध्यमातून षष्टेश त्यामुळे सरकारी नोकरीची संधी मिळाली. व्ययेश मंगळामुळे पोस्टिंग दूर गावी मिळाली. 

अर्थात हे काहीही असो आपल्याला  महत्वाच काय ? बदली होईल काय ? होणार असेल तर कधी ? 

पुन्हा आपली जंत्री बघा.  मंगळ चतुर्थेश म्हणूनही बलवान आहे. चतुर्थ स्थान हे मातृ स्थान आहे. स्व ठिकाण. म्हणजेच बदली होऊन जातक पुन्हा आपल्या मूळ गावी येणार हे नक्की. पण केंव्हा बदली होणार ? जंत्री बघू या.... शनीची अंतर्दशा कौटुंबिक सौख्य कमी करणारी आहे. शनी अजिबात बदली साठी किंवा  मूळ गावी येण्यासाठी पोषक नाही. 

मग मी पुढची अंतर्दशा बघितली. १३ जून नंतर बुधाची अंतर्दशा लागणार. बुध ६  ११  २ असून बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु १२ ५ ८ . बुधाची दशा लाभात असून कौटुंबिक सौख्य वाढवणारी आहे.  त्यामुळे बुधापेक्षा गुरु बलवान असूनही बदली होणार व तीही १३ जून नंतर पहिल्या आठ दिवसात. 

फोन वर मी कुंडलीच विश्लेषण समजावून सांगत असताना दीप्तीला सांगितलं कि १३ जून नंतर बदली होणार व तेही आठ दहा दिवसात. अर्थात अस ऐकल्यानंतर लगेचच विश्वास नसेल बसला म्हणा दीप्तीचा... पण त्यावेळी मात्र मला धन्यवाद सर अस काहीस म्हणाली. अन नेहमी प्रमाणे कामाच्या रगाड्यात मी हि घटना विसरून गेलो. 

अचानक सतरा कि  अठरा तारखेला नक्की आठवत नाही पण सायंकाळी दीप्तीचा फोन आला. "सर बहिणीची बदली झाली. १७ तारखेला तीने मुंबईत ड्युटी जॉईन केली". त्यावेळी मी एका कंसलटन्सित व्यस्त होतो  म्हणून  सविस्तर बोलता आल नाही. 

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब 

Tuesday 5 June 2012

घटस्फोट होणारच होता ! कारण ...?

!! श्री !!

नमस्कार मित्रानो !

दैवयोग, नियति काय प्रकार आहे याचा काहीना गंधही नसेल. ज्याचं सगळ आलबेल आहे, सिचुएशन अंडर कंट्रोल्ड आहे  अश्या सो कॉल्ड  लोकांना दैव, नियती वगैरे प्रकार  म्हणजे कर्तुत्व शून्य लोकांनी निर्माण केलेली पळवाट आहे असे वाटते. अर्थात अश्या लोकांनाही कधी न कधी नियतीचा दणका बसतोच. असो. 

काल सायंकाळी एक मध्यम वयीन जोडपं माझ्या कार्यालयात आले. मुलीची पत्रिका त्यांना जाणून घ्यायची होती. गेल्या वर्षा पूर्वी   मुलीच लग्न अत्यंत थाटामाटात करून दिल होत. लग्नात मानपान, जेवणावळ, पाहुण्यांची सरबराई वगैरे वगैरे गोष्टी सर्व निट  पार पाडल्या होत्या. तसच मुलीने सुखाने संसार करावा म्हणून समस्त नात्यागोत्याने भरभरून आशीर्वाद दिले होते. 

वर्षभर संसार सुखाचा झाला. अन अचानक दृष्ट लागली................... सासरकडच्या मंडळीने  सांगितले आम्ही मुलीला नांदवनार नाही........इतक्या दिवस गोडी गुलाबीने चाललेला संसार अचानक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला.... काय घडल अस ? 

अर्थात त्यांनी मला जे कारण सांगितलं ते मन सुन्न करणार होत. मुलीला अचानक काही कारण नसताना डायबीटीस डीटेक्ट  झाला. हा आजार मूळीच अनुवांशिक नव्हता. आई वडिलांना त्यामुळे काही सुचेना. कारण या आजाराच गांभीर्य त्यांना माहित नव्हत. पण सासर कडच्या मंडळीने धमकी दिलेली कि मुलीला काही झाल तर आम्ही दवाखाण्यात  घेऊन जाणार नाही. सासरकडच्या मंडळीनी अश्या पद्धतीने हातवर केल्यानंतर इलाजच खुंटला. ...... घटस्फोटा शिवाय पर्याय नव्हता. 

आता पुढे काय ? त्या माता पित्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मूळीच आरोग्य कस राहील तसेच तिच्या  लग्नाचं काय वगैरे ?

पत्रिकेत गुप्ततेमुळे मुलीच नाव काढून टाकले आहे. पत्रिका बाजूला देलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

सध्या जातकास राहूची महादशा व बुधाची अंतर्दशा सुरु आहे. राहूची महादशा  २०२१ पर्यंत कार्यरत आहे. तसेच बुधाची अंतर्दशा १६.०५.२०१४ पर्यंत. राहू अष्टमात, राहू रवीच्या नक्षत्रात, रवी सप्तमात, लग्नेश, राहू मंगळाच्या राशीत, मंगळ  अष्टमात, नवमेश तसेच चतुर्थेश, मंगळ केतूच्या नक्षत्रात , केतू कुटुंब स्थानी, केतू मंगळाच्या दृष्टीत, मंगळ पुन्हा ८, ९, ४ तसेच केतू गुरूच्या नक्षत्रात, गुरु ५, ५  ८, केतू शुक्राच्या राशीत शुक्र ८, १०, ३ व शुक्र बुधाच्या नक्षत्रात,      बुध ७, ११,  २

वरील जंत्रीच्या अभ्यासावरून असे लक्षात येत कि  वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र व सुख स्थानाचा  कारक ग्रह मंगळ  अष्टमात राहुबरोबर. त्यामुळे वैवाहिक सौख्य बिघडलेले आहे. पण या एकमेव कारणास्तव घटस्फोट होणार नाही. कारण अश्या स्थितीत फार फार तर भांडण तंटा, शारीरिक. मानसिक त्रास वगैरे प्रकार होतात. 

तरीही घटस्फोट झाला कारण या जातकाच्या पत्रिकेत पुनर्विवाहाचा योग आहे. भाव चलीत  पत्रिका नीट बघा. सप्तमात बुध आहे. तसेच राहूच्या महादशेत तो कार्येश आहे.  अंतर्दशाही  बुधाचीच आहे.   त्यामुळे पुनर्विवाहाचा योग याच दशेत आला. पुनर्विवाह तेंव्हाच होईल जेंव्हा आधीचे लग्न निकालात निघेल. इतर लोक याच कारण वर वर शोधतील, मुलीच्या सासरकडच्या मंडळीना जबाबदार धरतील. पण .... कारण काहीही असो कर्माचे भोग सुटत नाही. याला म्हणतात संचित. यावरच अवलंबून असत आपल  प्रारब्ध... !


शुभं भवतु ! 

आपला
नानासाहेब

Tuesday 15 May 2012

जातकांना सूचना

नमस्कार मित्रानो 

सालाबादा  प्रमाणे याही वर्षी मी विपश्यना साधने करिता इगतपुरी येथे  जात आहे. १६.०५.२०१२ ते २७.०५.२०१२ पर्यंत दहा दिवस कार्यालय  बंद राहील याची जातकांनी नोंद घ्यावी. 


शुभं भवतु  !

आपला
नानासाहेब 

Wednesday 2 May 2012

पेशांतर .....

!! श्री !!

मित्रानो परवा एका जातकाचा फोन आला. म्हंटला "धन्यवाद  सर ! नवीन नोकरीवर रुजू झालो". 

"अरे वा s s गुड न्यूज"  मी कसाबसा म्हणालो कारण त्यावेळेस मी नेमका कोर्टात होतो. एका खटल्याच्या काम काजा निमित्त मी गेलो होतो. फोन वाजताच तिथला शिपाई ओरडला "लांब जावून बोला नाहीतर मोबाईल जप्त होईल तुमचा"

दुपारी एक -  दोनच रण रणत उन,  कोर्टातील गर्दी, घामाच्या धारा, घाम पुसून पुसून पांढरा शुभ्र हात रुमाल  संशयास्पद पांढरा  राहिलेला . या सर्वांशी सोयरे सुतक नसलेलं कोर्टाचं चाललेलं संथ गतीच काम काज. अक्षरशः वीट आलेला होता. पण म्हणतात ना अडला हरी........  अन अश्या परीस्थित सुनीलचा फोन आनंदाची बातमी सांगणारा ....  सगळा वैताग गायब.  

"अभिनंदन जॉब मिळाल्या बद्धल" मी त्या शिपायाच्या म्हणण्या प्रमाणे खरोखरच बाजूला येऊन बोललो. हो s s उगाचच  जप्त बिप्त व्हायचा. नाहीतर हा स्वतः जप्त करायला बसला.     

"अगदी तुमी सांगितल्या प्रमाणेच मार्च नंतर व जुलै च्या आत नोकरी मिळाली" त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. आणि का नसणार, अचानक जॉब गेल्यानंतर घरी बसण्याची जेंव्हा वेळ येते तेंव्हा चांगले चांगले रथी महारथी परेशान होऊन जातात. तीन चार महिने मेहनत घेऊनही जॉब मिळत नसेल तर  अक्षरशः वेड लागण्याची पाळी येते. नवीन जॉब कधी मिळणार, कुठे मिळणार, कसा मिळणार  काही अंदाज नसतो.  अश्या वेळेला मिळेल त्या पगारावर काम करायला माणूस तयार होतो. कारण ज्याचा जॉब गेलाय तो कंपनीच्या व्यवस्थापना बरोबर बार्गेनिगच्या मूड मध्ये नसतोच, करूच शकत नाही तो.  त्यावेळची तातडीची आणि निकडीची गरज ताबोडतोब जॉब मिळण हि असते. नुसतच घरात बसून राहून घर खायला उठत. बायको, मुले असा संसारी माणूस असेल तर रात्र रात्र झोप येत नाही. मुलांकडे पाहून भयाण वाटत. रात्रीच्या भेसूर अंधारात उद्याच भविष्यही भेसुरच  वाटायला लागत. वर वर कितीही  पॉझीटीव थिंकिंग करा आतुन येणारा आवाज निगेटीवच  असतो. 

त्याची पत्रिका मी बाजूला दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

"फक्त घरा पासून दूर जाव लागतंय सर !   " त्याच्या बोलण्यातून खंत डोकावत होती. दूर जायचं  म्हणजे कुटुंबासह  स्थलांतर    

"काही हरकत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे ..." मी त्याला प्रोत्साहित करत म्हंटल. 

"मग सगळ्यांना घेऊन जावू कि कस करू ?" त्याने त्याच्या काळजीचा प्रश्न विचारला. 

"मी ऑफिस ला बसलो कि मग तुझी कुंडली बघून सांगतो"  मी पांढरा शर्ट  झटकत बोललो. तोही आता पांढरा राहिलेला नव्हता. त्यावेळी कोर्टाच्या बाहेर आलो होतो व तितक्यात एक रिक्षा प्रचंड धूळ उडवत निघून गेली होती. 

 बुध  महादशा  मार्च २०२२ पर्यंत आहे. बुध ३  ११  २  असून तो मंगळाच्या  नक्षत्रात  आहे व मंगळ १  ९  ४. जॉब गेला ती अंतर्दशा शुक्राची होती व ती मे २० ११  पर्यंत कार्यरत.  शुक्र ३  ३  १०, शुक्र गुरूच्या नक्षत्रात. गुरु २  ५  ८. म्हणजे शुक्र पंचमाचा कारक झाला अन जॉब गेला. त्यानंतर रवीची अंतर्दशा, रवी २ एप्रिल २०१२ पर्यंत कार्यरत. रवी २ १, रवी मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ १  ९  ४. म्हणजे रवी या अंतर्दशेत नोकरी मिळणार नाही. त्यानंतर चंद्राची अंतर्दशा सुरु झाली. चंद्र ११  १२, चंद्र राहूच्या नक्षत्रात, राहू ८ , राहूवर मंगळाची दृष्टी, मंगळ शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र ३  ३ १०,  म्हणजेच मंगळ दशमाचा कार्येश झाला. याच दशेत नोकरी मिळणार अस मी त्याला सांगितले होते. 

हा प्रश्न मी डिसेंबर २०११ मध्ये सोडवला होता. तो आधी कुठल्या तरी आय टी कंपनीत होता. 

नवम भावामुळे नोकरीत सारखे बदल होत राहणार. स्थैर्य हव असेल तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित नोकरीच टिकू शकेल असही मी त्याला बजावले होते. दुसरीकडे मात्र पुन्हा नोकरीत बदल पुन्हा तीच लफडी.  

अर्थात नवम भावामुळे तो एका शिक्षण संस्थेतच प्रिन्सिपल म्हणून रुजू झाला. पेशांतर.. व तृतीय भावामुळे घरापासून दूर जावे लागले. स्थलांतर. ...........

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब 

Thursday 19 April 2012

शैक्षणिक शाखेची निवड

नमस्कार मित्रानो ! 

परवा माझ्याकडे एक जातक आले. त्यांच्या मुलाच्या शिक्षणा बद्दल त्यांना निश्चित मार्गदर्शन घ्यायचं होत. हल्ली शिक्षण आणि करियर हे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. पूर्वी शिक्षण घेतलं कि कुठे तरी चिकटून अथवा  वशिल्याने चिकटवून घेऊन  पोट भरने हाच प्रमुख  विषय होता. अर्थातच नोकरी करिता निवड  हा निकष नसायचा. पण आता आवडीच्या क्षेत्राची निवड हा अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यामुळेच या विषयावर वाहिलेला थ्री इडीयट्स हा चित्रपट खूपच फेमस झाला व लोकमनावर व्यापून राहिला. 

मित्रानो पण  एक लक्ष्यात घ्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी अगोदर मुलाचा कल किंवा ज्याला करियर करायचं त्याचा कल कुठे आहे ते कळण गरजेच असत. म्हणजे ज्याला विशिष्ट क्षेत्रात करियर करायचं त्याला त्यात तो यशस्वी होईल का अशी शंका ब-याचदा निर्माण होते किंबहुना त्या संशयामुळेच ती व्यक्ती आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम न करता कुठेतरी मनाविरुद्ध पाट्या टाकायचं काम करत असते . आपल्या अवती भवती अशी बरीच मंडळी पाहायला मिळतात.   

काही लोक करीयरच्या नावाखाली प्रचंड संघर्ष करताना दिसतात. कधीतरी यशस्वी होतात. पण मग जगायचं राहून जात ना ! त्याच काय ? याला म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे. आता नुसती कल्पना करा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहताना  आयुष्याची किती झीज होत असेल. किती लोकांची अशी तयारी असते. अनेक सुखांचा त्याग करावाच लागतो. म्हणून तर संसारी माणसं आजही कितीही प्रबोधन केल तरी असल्या करियर पासून दूरच राहतात. ते रुटीन म्हणून जे शक्य आहे तेच करतात व आपल्या पाल्याच करीयरही अश्याच पद्धतीच निवडतात. मळलेल्या वाटेनेच जातात. नवीन वाट तयार करण्याच्या फंद्यात  पडत नाहीत. अर्थात  करियर म्हणजे नेहमी नवीन वाट असतेच अस नाही तर जेही काम आपण करतो त्यातून आत्मिक समाधान मिळायला हव आत्मिक जाऊ ध्या निदान अस समाधान मिळायला हव कि त्यात झोकून देता आल पाहिजे. म्हणजे मग प्रगती आपोआप होते.

करीयरमधील संघर्षाची इतर अनेक कारणे  असू शकतात. पण प्रमुख कारण म्हणजे ग्रहदशा. उदाहरण  म्हणून  नवम   भाव  घ्या.   कुंडलीतील नवम भावाचा संबंध शिक्षण क्षेत्राशी आहे. इतर क्षेत्रात जर व्यक्ती काम करत असेल व नवम भाव  कार्यरत असेल  तर  माणसाला स्थैर्य प्राप्त होत नाही. पण याच नवम भावाचा  गुणधर्म मात्र शिक्षण क्षेत्रात काम करणार-या लोकांना फार उपयुक्त आहे. अशी व्यक्ती  डॉक्टरेट होऊन प्राचार्य होऊ शकते. संशोधन करू शकते. जोडीला जर बुधाच कारकत्व असेल तर नामांकित लेखक होऊ शकतात. क्लासेस काढून क्लासेसची साखळी चालवू शकतात वगैरे वगैरे.

उजव्या बाजूला प्रणवची पत्रिका दिलेली आहे.ती टिचकी     मारून मोठी करून पाहता येईल.

या जातकाला सध्या शनीची महादशा चालू आहे. ती २०१८ पर्यंत आहे. नंतर बुध महादशा  २०३५ पर्यंत, केतू महादशा २०४२ पर्यंत, शुक्र महादशा २०६२ पर्यंत.

शनी महादशा १२  ८  १०   शनी रवीच्या नक्षत्रात, रवी ३  ४, बुध महादशा ३  १  बुध शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र  ४  ५  १२,  केतू रवीच्या नक्षत्रात रवी ३  ४,  शुक्र महादशा ४  ५  १२, शुक्र रवीच्या नक्षत्रात रवी पुन्हा ३  ४ या भावात

वरील जंत्री वरून शुक्र व चतुर्थ भावाच २०६२ पर्यंत कारकत्व लक्षात घेऊन मी सांगितले  कि या मुलाने ऑटो मोबाइल इंजिनियरिंग मध्ये करियर करणे उत्तम राहील.

यावर तो जातक आश्चर्यचकित झाला. म्हंटला "अहो काय सांगताय काय ? प्रणव सुद्धा ऑटो मोबाइल इंजिनियरच व्हायचं म्हणतोय."

"अरे वा ! छानच झाल कि मग. " मी म्हंटलो. आणखी काय बोलणार.

"चला हे एक बर झाल. म्हणजे काय करायचं हे निश्चित झाल कि  त्या दिशेने तयारी करता येते. नाहीतरी मी वाहन व्यवसायातच आहे. पण मला शो रुम टाकायला जमल नाही निदान याला तरी जमेल"

"का नाही जमणार ? अवश्य त्याचा तृतीय भाव एजन्सी लाईनच दाखवतोय"

"आज पासून कामाला लागायला हरकत नाही. पण एक शंका होती ?"  त्यांनी चिंतेने विचारल.

"काय ? जी शंका असेल ती स्पष्ट विचारा"

"आजच ठीक आहे पण  उद्या याची आवड बदलली  तर ?"

"त्यासाठीच तर तुम्ही इथे आलात  ना ? २०६२ पर्यंत याला हे करियर उत्तम राहील. हे सगळ पाहूनच मी तुम्हाला सांगितलं ना "

"मग काही हरकत नाही. दिशा पक्की ?" पुन्हा त्यांनी एकवार खात्री करून घेण्यासाठी विचारल.

"पक्की  पक्की  !"    मी त्यांना अपेक्षित खात्री दिली.

 मित्रानो लेख आवडला असेल तर शेअर कराच.....!

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब     

Monday 2 April 2012

नवकोट नारायणाच्या (अरब पती) पत्रिकेतील ग्रहयोग

नमस्कार 

मित्रानो  प्रत्येकाला  अस वाटत कि  आपण धनवान असाव. अर्थात अस वाटण्यात काही गैर नाही. पण प्रत्येकाच्या  नशिबात  तसे योग नसतात. मात्र ज्याच्या पत्रिकेत धनवान होण्याचा  योग असतो तो धनवान होतोच. मग तो उच्च शिक्षित आहे कि  साधारण,  दहावी कि फक्त प्राथमिक शिक्षण झालय याचा संबंध नसतो. बाजूला दिलेली पत्रिका बघा. त्यावर टिचकी मारून ती मोठी करून बघता येईल. 

पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानावरून जातकाची धनस्थिती कशी असेल ते कळते. पत्रिकेत या स्थानी जो ग्रह असेल त्याला धनेश म्हणतात. हे स्थान बिघडलेलं नसाव. मुख्य म्हणजे धनाचा कारक ग्रह हा गुरु आहे. गुरु सु-स्थितीत असला पाहिजे. किमान धन स्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी तरी असावी.  

आता या पत्रिकेत धन स्थानी मकर राशी आहे. त्याचा स्वामी शनी तोही त्याच स्थानात आहे.  धनेश धनात म्हणजे उत्तम. असा जातक खावून पिवून सुखी असतो.   ब-यापैकी बँक  बँलन्स  असतो. थोडक्यात हौस मौज करू शकतो. 

धनाचा कारक गुरु दशमात. मित्र ग्रह बुधाच्या कन्या राशीत. गुरूची पाचवी दृष्टी धन स्थानावर. दशमातील गुरु हा मोठ मोठ्या उलाढाली करायला लावतो. दशम स्थान हे कर्माच स्थान आहे. 

धन स्थानात शनी असल्यामुळे माणसाला  आयता  पैसा मिळत नाही. स्वत प्रचंड कष्ट करून  तो मिळवायला लागतात. शनी सहज सहजी यश मिळू देत नाही तसेच एकदम घबाड मिळवून देत नाही तसेच  शनी पाप ग्रह असला तरी तो वाईट कर्म करायाला  भाग पाडत नाही. शनी प्रत्येक काम तावून सुलाखून घेत असतो. या जागी जर राहू असला तर व्यक्ती वाम मार्गाने पैसा कमावणार हे नक्की. 
या व्यक्तीने जीवनात प्रचंड कष्ट केलेत. पेट्रोल पंपावर काम करण्यापासून ते भारतातील नामवंत उद्योगपती होण्यापर्यंत मजल मारली व प्रचंड पैसा कमावला इतका कि ते अरबपती म्हणून नावाजले गेलेत.  

मित्रानो हि धीरूभाई अंबानी यांची पत्रिका आहे. श्रमाचे मोल हे अनमोल असते. पण त्याला नशिबाची जोड असली कि अशी धीरूभाई सारखी मैलाचे दगड ठरणारी मानस  घडतात. 

शुभं भवतु ! 

आपला 
नानासाहेब

Wednesday 28 March 2012

विवाह बाह्य संबंध आणि मनस्ताप

ऑन लाईन कंसलटन्सी संपवून मी पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली हातातच घेतली होती इतक्यात  एक तरुण माणूस माझ्या कार्यालयात आला. मी त्याला बसायला सांगितलं. चेह-यावरून तो बराच त्रस्त दिसत होता. त्याच्या शारीरिक हालचालीवरून तो या क्षणी प्रचंड तणावात आहे हे लक्षात आल. अश्या वेळेस माणूस थोडक्यात आपली समस्या सांगूच शकत नाही हे गेल्या कितेक जातकांच्या अनुभवांती मला माहित झालेलं आहे. म्हणून मी त्याला आधी शांत करण्या करिता पाणी दिल. त्याच नाव, गाव विचारल, कोणी रेफरंस दिला वगैरे सारखे प्रश्न विचारले. हेतू हा होता कि आहे त्या मनस्थीतून थोडावेळ का होईना त्याला बाहेर काढण  आणि हेतू सफलही झाला बर का.   

मी त्याला विचारल "बोला काय अडचण आहे ?".

"आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात चालू आहेत, गेल्या चार दिवसांपासून मी झोपलेलो नाही ?"

"का ? अस  काय भयंकर घडल कि असे नको ते विचार डोक्यात यायला लागलेत ?" मी अगदी फ्रीज

"सांगायला लाज वाटते. पण सांगितलं पाहिजे. तुम्ही मला यातून बाहेर काढा."  तो दडपणाखाली बोलला.

"काय असेल ते सांगा. संकोच करू नका " 

त्यान बोलायला सुरवात केली. त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून जे काही कळल ते अस.....

त्याच लग्न झालेल आहे. त्याला दोन  मुल आहेत. बायकोही खूप चांगली सोज्वळ आहे. सर्व काही उत्तम चाललेलं असताना अचानक सहा सात महिन्या पूर्वी तो आणखी एका बाईच्या प्रेमात पडला. त्या बाई बरोबर जे काही संबंध होते ते चांगले चाललेले होते. अचानक  पाच सहा दिवसापूर्वी त्याचं टोकाच भांडण झाल. संबंध संपुष्टात आले आणि त्याची झोप उडाली. 

हे सगळ ऐकून मी म्हंटल " चांगल झाल. अश्या संबंधातून वाईटच निष्पन्न होत. आणखी काही वाईट घडण्या  अगोदर प्रकरण मिटल. आता नेमका प्रॉब्लेम काय आहे ?"

तो म्हंटला "मी तिला विसर म्हणता विसरू शकत नाही. रात्रं  दिवस तीच डोळ्यासमोर दिसते" 

"मग ? " मला कळेना मी काय मदत करू शकतो ते. 

"हे किती दिवस चालायचं ? मी यातन कधी बाहेर पडणार ? हे प्रकरण इथेच थांबेल कि परत पुढे चालू राहील ?"

अच्छा ! अस आहे होय. मला त्याची तीव्र इच्छा काय आहे ते कळल. पुनर्मिलन !

मी त्याची पत्रिका संघनकावर छापली व निरीक्षणाला सुरुवात केली.  
     
पत्रिका अभ्यासून झाल्यावर मी त्याला विचारल "या आधी पत्रिका कोणाला दाखवली  होती का ?"

तो म्हंटला "हो ब-याच जणांना दाखवली होती"

"त्यांनी काय सांगितलं होत " 

"तेच तर समजत नाही, प्रत्येकाने सांगितलं होत कि तुमच भविष्य उज्वल आहे. खूप जबरदस्त ग्रहबल का काय म्हणता ते आहे, पण प्रत्येक्षात तस काहीच घडल नाही. लग्ना आधी माझ कुठेही अस काही प्रकरण नव्हत. आताच कस झाल ते कळत नाही. काम धंदा सुद्धा धड चालत नाही. त्यामुळे जाम वैतागलोय मी"

मित्रहो  हि धनु लग्नाची कुंडली आहे. जे लोक लग्न कुंडली पाहून ज्योतिष सांगतात त्या फलिताची कशी काशी होते ते या पत्रिकेवरून आपल्या लक्षात येईल. पत्रिका बाजूलाच दिलेली आहे. नियमित वाचकांना सांगायची जरुरी नाही कि त्यावर टिचकी मारून मोठी करून पहा.

आधी लग्न कुंडली पहा. धनु लग्नाची पत्रिका आहे. लग्नेश  गुरु  लग्नात, त्याची सप्तमस्थानावर पूर्ण दृष्टी, सप्तमात शुक्र मिथुन राशीत. शुक्राची लग्नावर पूर्ण दृष्टी, चंद्र चतुर्थात तोही मीन या जल तत्वाच्या  राशीत,  मंगल भाग्यात,   रवी भाग्यात तेही स्वराशीत. अहाहा ! अशी पत्रिका म्हंटल्यावर माणूस कुटच्या कुठ जायला पाहिजे. नशीबवान आहेस पोरा !  अस त्यावेळी निव्वळ लग्न कुंडली मांडून ज्योतिष सांगणं-यांनी नक्कीच सांगितलं असणार. 

आता भाव चलित पत्रिका पहा. भाव चलित पत्रिका गणिताने तयार होते. गणित चुकल कि पत्रिका चुकते. असली गणित करायला ज्यांच्याकडे दरबार भरतो त्यांना वेळ मिळणार कधी ? असो . पूर्वी अस चालायचं. आता संघनकामुळे गणित करायची वेळ येत नाही. 

भाव चलित पत्रिकेत लग्नात राहू , धनु हि राशी द्विस्वभाव राशी आहे. त्यामुळे धनु लग्नाला सप्तम स्थान हे बाधकेश आणि मारकेश होत. सप्तमाचा स्वामी बुध अष्टमात. म्हणजेच सप्तमेश अष्टमात. गुरु व्ययात. काय होणार ? स्पष्ट आहे विवाह बाह्य संबंध किंवा अनैतिक संबंध  येणारच.

तसे आलेत, पण बुध अष्टमात  कर्क राशीत व सप्तमेश त्यामुळे वैवाहिक सौख्य अस्थिर,  मंगळ पंचमेशही  आहे. मंगळ पंचमेश असल्यामुळे प्रेम प्रकरणात मनस्ताप, चंद्र अष्टमेश त्यामुळे  मानसिक  संतुलन बिघडलेलं व कळस म्हणजे लग्नातील विषारी राहू डोक खराब करणार. चांगला विचारच सुचणार नाही, अविचारही  अविचार !  शिवाय लग्न धनु, धनु राशी म्हंटल म्हणजे असे  लोक नेहमी टोकाचीच भूमिका घेतात. एखाद्याच चांगल करायचं अस ठरलं तर लंगोटी सोडून देतील व वाईट करायचं ठरवलं तर जीव घेतील.

मी सर्व अभ्यास करून त्याला सांगितलं कि अजून चार वर्ष तुमचे संबंध टिकून राहतील. तोपर्यंत मंगळ पंचमेश आहे. नंतर शुक्राची महादशा लागेल व शुक्र सप्तमात मजबूत लागणार त्यामुळे वैवाहिक संबंध चांगले बळकट होतील. शुक्र गुरूच्या नक्षत्रात आहे व गुरु चतुर्थेश. एकदा का हि दशा लागली कि विषय संपला. 

यावर तो म्हंटला "आमचा संबंध आज न उद्या संपणार असेल तर आजच थांबायला काय हरकत आहे. मी आजच हे थांबवून टाकतो. अनायशा कारणही मिळाल आहे."

"वा वा क्या बात है ? जरूर जरूर ! असा पुरुषार्थ दाखवला पाहिजे " मी त्याला प्रोत्साहन देत म्हंटल खरी पण.. ? शक्य होत का हे त्याला ?

बोलता बोलता त्याला अचानक फोन आला आणि तो मग बोलतच राहिला. त्याचा तणाव ग्रस्त चेहरा नॉर्मलला येऊ लागला. हळू हळू तो विसरून गेला कि थोड्यावेळापूर्वी कसल्या भयंकर तणावातून गेलोय आपण. 

बोलतच तो उठला व खिशात हात घालून माझी फी दिली माझ्याकडे पाहून हातानेच परत येतो वगैरे सारख्या खुणा करून तो ऑफिस च्या बाहेर पडला. 

कोणाचा बर असेल तो कॉल ? येतोय का गेस करता? 

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब 

Saturday 24 March 2012

संतती सौख्य आणी प्रारब्ध

नुकतीच एक कंसलटन्सी संपवून मी जरा निवांत होतो न होतो तोच एक महिला जातक आल्या. अर्थात त्या   अपॉइंटमेंट घेऊनच आल्या  होत्या व अगदी वेळेवरही आल्या होत्या. मी त्यांना बसायला सांगितलं.

त्या जरा निवांत होताच मी म्हंटल "बोला काय अडचण आहे ?"

यावर त्यांनी काही क्षण विचार केला व सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या "माझा संतती बद्दल प्रश्न आहे. द्वितीय संततीचा योग आहे किंवा नाही ते सांगा व असलाच तर कधी ?" .

मी संघणकावर  लगेचच त्यांची कुंडली छापून घेतली . ती बाजूला दिलेली आहे. गोपनियतेमुळे  मी नाव काढून टाकलय. 

पत्रिकेस शनीची  महादशा सुरू असून ती २०३० पर्यंत कार्यरत आहे. 

शनी  षष्टात,    लग्नेश  व  द्वितीयेश , शनी शनिच्याच नक्षत्रात त्यामुळे त्याचा उप नक्षत्र कार्येश होईल. शनी बुधाच्या उप नक्षत्रात, बुध चतुर्थात, षष्टात व नवमेश. म्हणजेच हि महादशा संततीस अजिबात पोषक नाही. शनी कुटुंब स्थानाचा क्षीण कार्येश आहे. म्हणजे संतती होणार पण सहजा सहजी नाही. कारण बुध चतुर्थाचा मजबूत कार्येश आहे.  अश्या स्थितीत गर्भपात होण, मुल न राहण वगैरे घटना घडतात.

या आधीची महादशा पहिली, ती गुरूची होती. 
गुरु ३  १२     गुरु - शुक्राच्या नक्षत्रात,  शुक्र ४  ५  १० 

म्हणजे प्रथम संततीस सुद्धा त्रास झाला असणार. मी तस त्या महिलेस विचारल. त्यांनी ते कबुल केल. त्या म्हणाल्या "पहिल्या संततीस सुद्धा खूप अडचणी आल्या. मेडिकल  ट्रीट मेंट घेतल्या नंतरच २००२ - २००३ मध्ये मुल झाल. त्या आधी ब-याच वेळा ट्रीटमेंट फेल सुद्धा  गेल्या. पाण्यासारखा पैसा खर्च झाला.  पहिल्या अपत्या नंतर आम्ही पुन्हा त्या डॉक्टरांकडून दुस-या अपत्या साठी  ट्रीट मेंट घेतली पण या वेळेस मात्र अपयश आल. अस  का ? "

अस का च उत्तर मी शोधल. गुरूच्या महादशेत त्यांना केतूची अंतर्दशा असताना पाहिलं अपत्य  झाल. 

केतू गुरूच्या युतीत, गुरु ३  १२,  व गुरु शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र ४  ५  १०     असा आहे.  केतूच्या अंतर्दशेत शुक्र पंचमेश आहे. त्यामुळे पहिलं मुल झाल. 

केतू नंतर एकही  अंतर्दशा पंचमाची कारक नाही. त्यामुळे द्वितीय संततीस त्रास. आता शनीच्या महादशेत व केतुच्याच अंतर्दशेत त्यांना दुसरे अपत्य होईल. हि केतूची अंतर्दशा अजून दोन वर्षांनी येणार. त्यात शुक्रच  कार्यरत, तो चतुर्थाचा मजबूत कार्येश त्यामुळे याहीवेळेस सहजा सहजी मुल होणार नाही हे नक्की. वैद्यकीय उपचार करावेच लागतील पण शुक्र पंचमेशही आहे त्यामुळे दुसर अपत्य  होणारच.

वरील जंत्रीच अवलोकन करून मी त्यांना सांगितलं कि अजून दोन वर्ष संतती योग नाही. त्या म्हंटल्या अजून दोन वर्ष ? आधीच उशीर झालाय.

मी म्हंटल "ना इलाज को क्या इलाज. जर कोणी डॉक्टर ग्यारंटी घेत असेल तर उपचार चालू ठेवा."  

त्या म्हंटल्या "कुठलाच डॉक्टर अशी ग्यारंटी घेत नाही. लाखो रुपये पाण्यात जाण्या पेक्षा एकदा नशिबात काय आहे ते बघून घ्याव म्हणून मी आले होते"

मी म्हंटल "जेंव्हा योग असतील त्याच वेळेस उपचार केले तर यश नक्की येईल, पैसाहि वाया जानार नाही, शारीरिक ,मानसिक  त्रासातूनही सुटका "  

त्या म्हंटल्या " तुम्ही म्हणता तेच योग्य अस  अनुभवांती पटतय. दोन वर्ष थांबणेच योग्य राहील"


शुभ भवन्तु !

आपला
नानासाहेब
------------------------------------------------------------------------------------------------------
लेख आवडला तर लेखाच्या खाली असलेल्या Face book, Google+  चिन्हावर क्लिक करून शेअर करा. 
Keywords to search this blog  jotish, atrology, horoscope, bhavishya, kp,  rashi, krishnamurti paddhati