Wednesday 13 January 2016

नॉट फिलिंग वेल - गोचर भ्रमण

नमस्कार मित्रांनो


सकाळी उठलो तर अंगात कणकण जाणवत होती. डोक जड़ वाटत होत. तसच आवरायला घेतल. आंघोळ करून बाथरूमच्या बाहेरच आलो तर एका मागे एक सटासट दोन शिंका आल्या. नाश्ता करून कपडे घाले पर्यन्त शिंका येण्याच प्रमाण वाढल. मग मात्र ऑफिसला जाण्याचा विचार सोडून दिला. आणखी त्रास करुन घेण्यापेक्षा आज सुट्टी घेऊ म्हणजे निदान उद्या तरी बर वाटेल हा हेतू.

सर्दिच्या गोळया घेतल्या व आराम करत कै. अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी वाचायाला घेतली. रात्रि पुन्हा गोळयांचा डोस घेतला कारण रात्रि चांगलाच ताप अंगात भरला होता. म्हंटल सर्दी झालीय ताप येणारच.

दुस-या दिवशी सकाळी उठण्याची इच्छाच होईना. अंगात कणकण होतीच. वाटल आंघोळ करून फ्रेश वाटेल. पण कसल काय, डोळे टोपसले होते. निर्णय घेतला आजही आरामच करू. दुपार नंतर घरचे मागे लागले दवाखान्यात जा म्हणून. मी म्हंटल सर्दिचा ताप आहे काय दवाखान्यात जायच. अस म्हणून मी ते टाळल.

रात्रि नऊ साडे नऊ झाले असतील. घरच्यांच चालूच, दवाखान्यात जाऊन ये. आमच ऐकल असत तर कालच बर वाटल असत वगैरे. मग मात्र मी लगेचच दवाखान्यात जायच ठरवल. डॉक्टराना फोन केला तर डॉक्टर साहेब गेस्ट आलेत म्हणून क्लिनिक बंद करून घरी निघून गेले होते. उद्या सकाळी बघू म्हणून पुन्हा एकदा गोळयांचा डोस घेऊन गुड नाईट म्हंटल.

अखेर तिस-या दिवशी क्लिनिक, डॉक्टर, इंजेक्शन, प्रिस्क्रिप्शन, पुन्हा गोळयांचा डोस वगैरे गोष्टी झाल्या. दुपारनंतर मात्र सर्दी जुकाम कणकण गायब. बर वाटायला लागल. दुपारच जेवण झाल्यावर जरा आराम करावा म्हणून पडलो, डोळा लागत असतानाच विचार आला की आपल्या कुंडलित ग्रहांच गोचर भ्रमण काय म्हणतय. आजारी पडण्याच कारण तरी शोधुया म्हणून पंचांग उघडल.

मी आजारी पडलो त्या दिवशी तारीख होती 7 जानेवारी 2016.  पंचांग बघा त्या दिवशी चन्द्र वृश्चिक राशीत व  अनुराधा नक्षत्रात होता. मंगळ तूळेत, शुक्र, शनि वृश्चिक राशीत , रवि धनु राशीत.

माझी मेष लग्नाची कुंडली आहे. मेष लग्नाला वृश्चिक रास अष्टमात येते. अष्टम स्थान हे त्रिक स्थानापैकी एक आहे. मेष लग्न हे चर लग्न असल्याने बाधकेश शनि येतो तसेच परम मारकेश होतो शुक्र.

याचाच अर्थ हा की परम मारकेश शुक्र अष्टमात, बाधकेश शनि अष्टमात, लग्नेश मंगळ तुळेत मारक स्थानात अशी मजबूत कुस्थिति. आता  घटना घडून येण्यासाठी फ़क्त गोचरिने चंद्राच अष्टमातून भ्रमण हेच काय ते बाकी होत.

आणि हे भ्रमण सुरु झाल ६ जानेवारीला. या दिवशी चन्द्र वृश्चिक राशीत आला. पण ७ जानेवारीला अनुराधा नक्षत्रातून त्याच  भ्रमण सुरु झाल आणी त्यादिवशी मी आजारी पडलो. नाकातून पाणी वाहतंय , डोळ्यातून पाणी वाहतंय , डोक भनभन करतंय, अंगात सडकून  ताप भरलेला.  म्हणजे अगदी बेड रेस्ट.  

हिवताप किंवा कुठलाही किरकोळ तात्पुरत्या स्वरूपाचा आजार चंद्राच गोचर भ्रमण ठरवत. त्याकरिता महादशा बगण्याची आवश्यकता नाही.पण अंतर्दशा किंवा विदशा त्रिक स्थानाची कार्येश असायला हवी

ग्रह गोचरीचा असा विस्मय कारक अनुभव अभ्यासकांनी स्वताच्या बाबतीत कधीतरी निश्चित घ्यायला हवा.

शुभं भवतु ।

आपला
नानासाहेब