नमस्कार !
मागे म्हणजे ३० डिसेंबर २०११ ला माझ्या कार्यालयात एक महिला व दोन सज्जन आले होते. महिला थोडी कृश दिसत होती. अर्थात हे कुटुंब शेतकरी होतं. मी त्यांना काही विचारायच्या आत त्यांनी आपल येण्याच कारण सांगितलं.
त्या महिलेचे वडील वारले होते. वारस म्हणून तिचही नाव स्थावर जंगम वर लागल होत. आता त्या जमीन विक्रीचा व्यवहार ठरला होता. व्यवहार ब-याच दिवसांपासून ठरलेला होता, पण जमीन घेणारी पार्टी आज उद्या करत होती.
अर्थात व्यवहार मोठा असल्यामुळे अस होऊ शकत. अश्या शुल्लक कारणासाठी कोणी ज्योतीर्विदाकडे येत नाही. तसं मी त्यांना बोललोही.
त्यावर ते म्हंटले "हे आजच नाही अस ब-याच महिन्यांपासून चालू आहे. अनेक व्यवहार ठरून मोडलेत. देवा धर्माची काही अडचण आहे का ? किंवा दिवंगत आत्म्याचा काही त्रास आहे का ? ते विचारण्यासाठी आलोत. काही शांती वगैरे करावी लागेल का ? काय उपाय असतील ते सांगा आमी ते करू "
मी यावर काही अधिक भाष्य न करता टोकन ची पिशवी पुढे केली व त्या महिलेस सांगितलं "मनात असा प्रश्न करा कि जमीन विकली जाऊन मला लाभ होईल का ?"
तिने १६८ नम्बरच टोकन काढल. तो के पी सिड घेऊन मी प्रश्न कुंडली तयार केली. ती कुंडली बाजूलाच दिली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.
प्रश्न कुंडलीत चंद्र तृतीयात आल्यामुळे प्रश्न मनापासून विचारला हे दिसलं. कुठलीही स्थावर जंगम मालमत्ता विक्री होईल का हे बघताना दशमाचा उप नक्षत्र स्वामी ३ ५ ६ १० चा कार्येश आहे का हे पाहिल जात.
या प्रश्न कुंडलीत दशमाचा उप नक्षत्र स्वामी शुक्र २ ६ ११ चा कार्येश आहे तसेच तो चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र ३ ८ आहे. त्यामुळे शुक्र २ ६ ११ बरोबरच ३ ८ चा बलवान कार्येश झालाय. म्हणजेच जमीन विक्री होणार यात काही शंकाच नाही. तस मी त्यांना सांगितलं. लगेचच पुढील अपेक्षित प्रश्न आला. कधी ?
प्रश्न कुंडलीला गुरूची महादशा, शनीची अंतर दशा व शुक्राची विदशा सुरु आहे.
महादशा गुरु १६.०९.२०२४ पर्यंत, अंतर्दशा शनी १७.०५.२०१३ पर्यंत, विदशा शुक्र ०४.०३.२०१२ पर्यंत आहे.
गुरु ४ ४ १ असून तो केतूच्या नक्षत्रात आहे. केतूवर बुधाची दृष्टी, बुध १२ ७ १० , बुध मंगळाच्या नक्षत्रात मंगळ ९ १२ ५. केतूचा नक्षत्रस्वामी चंद्र ३ ८ आहे. म्हणजेच महादशा तृतीयाची बलवान कार्येश आहे तसेच मंगळाशी संबंधित आहे. जमिनीच्या कुठल्याही कामा संबंधात मंगळाचा संबंध असायला लागतो.
अंतर्दशा स्वामी शनी १० २ ३ असून शनी मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ ९ १२ ५. याचा अर्थ शनी अंतर्दशाही जमीन विक्रीला अनुकूल आहे.
विदशा स्वामी शुक्र २ ६ ११ , शुक्र चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र ३ ८ . या विदशेत शुक्र २ ६ ११ ३ चा कार्येश आहे त्यामुळे व्यवहार पूर्ण होईल अस जरी वाटत असलं तरी लाभेश अष्टमात असल्यामुळे अपेक्षित व्यवहार होणार नाही.
यानंतर रवीची विदशा आहे. रवी १ ९ असून रवी शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र २ ६ ११ चा बलवान कार्येश आहे. त्यामुळे व्यवहार पूर्ण तर होईलच पण शुक्र २ ६ चा कार्येश असल्यामुळे चांगल्या प्रतीचा लाभ होईल.
मी वरील जंत्रीच अवलोकन करून त्यांना सांगितलं कि ४ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान जमीन विकली जाईल.
मी अस म्हणताच ते सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. त्यांच्या चे-यावर विस्मय दिसत होता.
त्यांच्यातला एक जन म्हंटला "अहो काय सांगताय काय ? आत्ता ३ वाजता बँकेत पैसे जमा होणार आहेत. आजच खरेदी आहे, आणि तुम्ही म्हणताय अजून दोन महिने ?"
मलाही हे ऐकून धक्काच बसला "अहो ३ वाजता जर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि आजच खरेदी आहे, मग १ वाजता माझ्याकडे येऊन प्रश्न विचारण्याच कारण काय ? "
तर यावर उत्तर काय ? "आता पर्यंत प्रत्येक वेळेस काहीना काही अडचण येत राहिली, आता काही विघ्न नको म्हणून आलो. काही अडचण असेल तर त्यावर लगेच उपाय करून टाकू "
जरी ३ वाजता यांना पैसे मिळणार होते तरी मी त्यांना सांगितलं कि "तुमचा व्यवहार मार्च नंतरच पूर्ण होईल. माझा या शास्त्रावर प्रचंड विश्वास आहे. बघू काय होत ते ?" हे अक्षरश: एक प्रकारे आव्हानच होत.
त्यानंतर ते लोक निघून गेलेत. कामाच्या व्यापात मीही हि गोष्ट विसरून गेलो. आता परवा कार्यालयात येत असताना त्यांच्यापैकी एक जन रस्त्यात अचानक भेटला व म्हणाला ओळखल का ? वगैरे वगैरे. त्याने त्यांच्या भेटीच सांगितल्यावर मी ओळखल. म्हंटल "काय मग ? विकली का जमीन ?"
म्हणाला "नाही. तुम्ही सांगितलं तसच झाल. त्या दिवशी खरेदीला पार्टी आलीच नाही. बहुतेक मार्च नंतरच व्यवहार पूर्ण होईल अस दिसतंय."
अश्या प्रकारे शास्त्राची प्रचीती आल्यानंतर आनंद झाल्याशिवाय राहत नाही हे खरच .
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
1 comment:
Wonderful !! Such a great test of KP and very good results !
Post a Comment